ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा घेतली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या गटासह भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. आपण कोकणातील लोकांना भेटण्यासाठी आलो आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. या भाषणानंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली.
उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडताना रामदास कदम म्हणाले, “आहो, उद्धवजी तुम्ही मला सांगा, तुम्ही मुख्यमंत्री असताना कोकणात प्रचंड वादळं आली. कोकणाची किनारपट्टी सगळी उद्धवस्त झाली. तेव्हा शरद पवारांसारखा ८२ वर्षांचा वयस्कर माणूस चार दिवस कोकणाला न्याय देण्यासाठी आला. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे नेतेही आले. तेव्हा तुम्ही बापलेक आलात का? का आला नाहीत?”
हेही वाचा- “…तर अजित पवार नक्की मुख्यमंत्री झाले असते” रामदास कदमांचं मोठं विधान
उद्धव ठाकरेंना उद्देशून रामदास कदम पुढे म्हणाले, “काल तुम्ही म्हणाले, कोकण माझा बालेकिल्ला आहे. पण कोकणचा माणूस अडचणीत होता. माझा मच्छिमार अडचणीत होता. तेव्हा तुझा कोकण कुठे गेला होता रे बाबा… तेव्हा योगेश कदम याने पुढाकार घेतला. मी स्वत: अजित पवारांना फोन केला. केंद्र सरकारचे निकष बदलून वादळात अडकलेल्या मच्छिमारांना आम्ही बापलेकांनी मदत केली. योगेश कदम रात्रंदिवस काम करत होता. मी आजारी असतानाही दापोलीत येऊन बसलो होतो. तेव्हा तुम्ही बापलेक कुठे होता?”
हेही वाचा- “उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा, पण…”, २०२४ च्या निवडणुकीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान
“जगाच्या इतिहासात बाप मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेट मंत्री आणि नेता बाहेर… हे पहिल्यांदा घडलं असेल. तुम्ही तुमची हौस भागवून घेत आहात काय? कोकणातील लोकांना भावनात्मक आवाहन करायचं थांबवा. आता हळुहळू महाराष्ट्राच्या जनतेलाही उद्धव ठाकरे काय आहेत, हे समजेल,” अशा शब्दांत रामदास कदमांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला.