काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी खेडमध्ये जाहीर सभा घेतली होती. या सभेत त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली होती. मात्र, उद्धव ठाकरेंना उत्तर देण्यासाठी शिंदे गटाकडून खेडमधील त्याच मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, या सभेपूर्वी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका जोरदार टीका केली आहे. तसेच भास्कर जाधव यांना २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा आमदार होऊ देणार नाही, असे आव्हानही त्यांनी दिले. टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – ४८ जागा लढवायला आम्ही मूर्ख आहोत का?, संजय शिरसाटांचा बावनकुळेंवर पलटवार
काय म्हणाले रामदास कदम?
भास्कर जाधव चिपळूणचं बांडगुळ आहे. त्याला मी दोन कवडीची किंमत देत नाही. तो नाच्या आहे. त्याचा मेंदू सडला आहे. तो उपकाराची जाणीव न ठेवणारा माणूस आहे. इतका महानीच माणून मी अख्या जगात कुठं बघितला आहे. खाल्लेल्या घराचे वासे मोजणारी औलाद म्हणजे भास्कर जाधव, अशी घणाघाती टीका रामदास कदम यांनी केली आहे. तसेच २०२४ च्या निवडणुकीत मी भास्कर जाधवला राजकारणातून गाडणारच, त्याला परत विधानसभा बघू देणार नाही, असे आव्हानही त्यांनी दिले.
उद्धव ठाकरेंनाही केलं लक्ष्य
पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केलं. उद्धव ठाकरेंनी योगश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा विडा उचलला होता. यापूर्वी मला संपवण्यासाठी संजय कदम यांना तीन वेळा मातोश्रीवर बोलावण्यात आले होते. मात्र, माझ्या दबावामुळे त्यांना ते शक्य झालं नाही. योगश कदम यांना पाडण्यासाठी पाटील नावाच्या एका बाईला समाजाची नेता म्हणून उभं करण्यात आलं होत. हे षडयंत्र उद्धव ठाकरेंनी रचलं होतं, अशी टीका रामदास कदम यांनी केली.
हेही वाचा – शेतकऱ्यांचा महामोर्चा अखेर स्थगित, जे. पी. गावित यांची घोषणा
उद्धव ठाकरेंची तुलना थेट अफझलखानाशी
यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंची तुलना थेट अफझलखानाशी केली. ज्या प्रकारे अफझलखान स्वराज्यावर चालून आला होता, त्याप्रमाणेच उद्धव ठाकरे उभा महाराष्ट्र घेऊन खेडमध्ये चालून आले होते. याचं उत्तर त्यांना १९ तारखेच्या सभेत मिळेल, असेही ते म्हणाले.