सध्या पाक सीमेवर पाक सैन्याकडून शस्त्रसंधीचा भंग करून भारतावर हल्ले वाढत असताना देशाच्या सुरक्षा व हितापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी मतांचा जोगवा मागणे महत्त्वाचे वाटते. मोदी हे इतक्या खालच्या पातळीवर जातील, असे वाटले नव्हते, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केली.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील सेनेचे उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत कदम बोलत होते. याप्रसंगी सेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शहर प्रमुख प्रताप चव्हाण, उमेदवार महेश कोठे आदी उपस्थित होते.
नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात महायुती तोडून भाजपला पूर्ण बहुमत मिळण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली असली तरी छत्रपती शिवरायांच्या या राज्यात कमळाबाईंचे फूल फुलत नाही तर सुकत चालले आहे. एक दिवस हे फूल सुकून खाली गळून पडणार आहे, असा दावाही कदम यांनी केला.
ते म्हणाले, सीमेवर पाक लष्कराकडून हल्ले थांबतील, सीमेपलीकडून वाढणारा दहशतवाद संपेल, देशातील माय-भगिनींची अब्रू सुरक्षित राहील आणि सर्वाचा विकास साधला जाईल, या भावनेने शिवसेनेने मोदी यांना पाठिंबा दिला. परंतु त्यांनी सेनेच्याच पाठीत खंजीर खुपसला. शिवसेना संपविण्याचा घाट घातला जात असला तरी शिवसेना कधीही संपणार तर नाहीच, उलट एक दिवस भाजपचा बदला घेतल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही, अशा शब्दांत कदम यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

Story img Loader