दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यावरून सध्या एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात संघर्ष बघायला मिळतो आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत सर्वप्रथम शिवसेनेने अर्ज केला. त्यानंतर शिंदे गटातर्फे आमदार सदा सरवणकर यांनी महापालिकेकडे अर्ज केला. सध्या महापालिकेकडे दोन्ही अर्ज प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिंदे गटाची बैठक वांद्रे येथे झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दसरा मेळाव्याच्या तयारीसह इतर विषयांबाबत चर्चा केली. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान आपल्यालाच मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी बैठकीत व्यक्त केला. दरम्यान, आता या वादात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उडी घेतली आहे. आमचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होईल, असा विश्वास त्यांनी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला आहे. तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे.
हेही वाचा – Municipal Election: शिंदे गटासोबत युती करणार? मनसेकडून मोठं विधान, म्हणाले “आमचे निर्णय भाजपा…”
काय म्हणाले रामदास कदम?
“आमची शिवसेना बाळासाहेबांच्या विचारावर चालते आहे. आमचा दसरा मेळावा, शिवतीर्थावर झाला पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. गेले अनेक वर्ष एक नेता, एक आवाज, एक झेंडा, एक विचार, हे सर्व देशाने पाहिलेलं आहे. संपूर्ण देशाला बाळासाहेब एक विचार देत होते. मात्र,आता उद्धव ठाकरे जे विचार देतील ते सोनिया गांधींचे विचार असतील, त्यामुळे शिवसेना प्रमुखांचे विचार शिवतीर्थावरून देशभरात पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा झाला पाहिजे”, असे ते म्हणाले.
हेही वाचा – ‘आमचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच’ ; परवानगी मिळण्याबाबत मुख्यमंत्र्यांना विश्वास
“ठाकरे गटाला रोखण्यापेक्षा महाराष्ट्राचा विकास डोळ्यासमोर ठेऊन काम करायला हवं, ते त्यांचे काम करतील. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे की, आपण ठाकरे गटाकडे लक्ष न देता, महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष द्यायला हवं. शिवसेना प्रमुख्य बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं काम आपल्याकडून कसं होईल, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे”, असेही ते म्हणाले.