शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज पत्रकारपरिषदेत बोलताना शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली. अनिल परब हे शिवसेना संपवायला निघाले आहेत. ते शिवसेनेचा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालालया निघाले आहेत, गद्दार मी नाही तर शिवसेनेचा गद्दार अनिल परब आहे. असं रामदास कदम यांनी बोलून दाखवलं. तसेच, अनिल परब म्हणजेच जर शिवसेना असेल तर आपली भूमिका काय असेल हे देखील रामदास कदम यांनी यावेळी स्पष्ट केलं.

पत्रकारपरिषदेनंतर जर पक्ष नेतृत्वाकडून किंवा पक्षाकडून तुमच्यावर कारवाई केली गेली तर आपली काय भूमिका? या प्रश्नाला उत्तर देताना रामदास कदम यांनी सांगितले की, “मी पक्षाच्याविरोधात कुठेही काहीही बोललेलो नाही. अनिल परब म्हणजेच जर पक्ष असेल, तर आम्ही बसू कायमचं घरी. मग काही इलाज नाही. अनिल परब म्हणजेच जर पक्ष असेल आणि रामदास कदमचं पक्षासाठीच योगदान म्हणजे काहीच नाही. अशीच जर भूमिका भविष्यात घेतली गेली तर त्याला कोण काय करू शकतं.”

जेव्हा मी संघर्ष करत होतो तेव्हा अनिल परब कुठे होता? –

तर या अगोदर अनिल परबांवर घणाघात करताना रामदास कदम म्हणाले की, “अनिल परब शिवसेनेचा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालायला निघाला आहे. शिवसेनेची नगरपरिषद राष्ट्रवादीच्या घशात घालायला निघाला आहे. गद्दारांनी हाताशी घेऊन स्थानिक शिवसेनेच्या आमदारास बाजूला ठेवून हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालण्यासाठी अनिल परब निघाला आहे, गद्दार तो आहे. घोषणा द्यायच्या असतील तर त्याच्याविरोधात द्या. जेव्हा मी संघर्ष करत होतो तेव्हा अनिल परब कुठे होता?” असा सवाल देखील रामदास कदम यांनी उपस्थित केला.

मी कडवा शिवसैनिक आहे, मी भगव्या झेंड्याचा शिपाई आहे –

याचबरोबर, “ तुमची वैयक्तिक मालमत्ता म्हणजे शिवसेनेची नाही. तुमच्या हॉटेलवर बोललो म्हणजे ती काय शिवसेनेची मालमत्ता नाही. मी शिवसेनेवर बोललेलो नाही. अनिल परब म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख नाही. उगाच माझ्यावर गद्दारीचा शिका लावू नका. मी कडवा शिवसैनिक आहे, मी भगव्या झेंड्याचा शिपाई आहे. मी कधीच स्वत:ला डाग लावून घेतला नाही. असंही यावेळी रामदास कदम यांनी बोलून दाखवलं.

अन्याय किती सहन करायचा याला देखील मर्यादा असतात –

“अन्याय किती सहन करायचा याला देखील मर्यादा असतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माझी हात जोडून विनंती आहे की, तुम्ही स्वत: यामध्ये लक्ष घाला. अनिल परबच्या डोक्यात हवा गेली आहे, त्याचे पाय जमिनीवर नाही. त्याचे पाय पुन्हा जमिनीवर आणा. मी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात अनिल परबला हरामखोर म्हटलेलं आहे. त्याला हरामखोराला थांबावा, याला मंत्रीपद दिलं ते नेत्यांना संपवण्यासाठी नाही तर शिवसेना वाढवण्यासाठी दिलेलं आहे, असं त्या पत्रात लिहिलेलं होतं. या माझ्या भावना आहेत. ” असं रामदास कदम म्हणाले.

“अनिल परबांना एसटी कामगारांसाठी वेळ नाही पण माझ्या मुलाला…”; रामदास कदमांचा हल्लाबोल

तसेच, “अनिल परब म्हणजे सध्या पक्षप्रमुखच असल्याचं दिसत आहे, कारण त्यांच्याविरोधात बोललो म्हणजे पक्षाच्या विरोधात बोललो असंच चाललं आहे सगळं. एसटी कामगारांच्या आत्महत्या सुरू आहेत, त्यांची भेट घ्यायला अनिल परबांकडे वेळ नाही आणि रामदास कदमच्या मुलाला संपवण्यासाठी तीन-तीन दिवस दापोलीत ठाण मांडून बसायला वेळ आहे, हे निषेधार्य आहे.” अशा शब्दांमध्ये रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला.

“माझं आणि मुलाचं तिकीट कापण्यासाठी अनिल परबांचे प्रयत्न”, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप!

शिवसेनेच्या मंत्र्याच्या विरोधात भाजपाच्या नेत्यांना काही पुरावे दिल्याचा आरोपानंतर रामदास कदम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याबाबतची एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती. या क्लिपमधून ते शिवसेना परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात कारवाई करत असल्याचे म्हटले जात होते. परब यांचा रिसॉर्ट पाडण्यासाठी कदम हे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना मदत करत असल्याचे म्हटले जात होते. ही क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यावर रामदास कदम यांनी स्पष्टीकरण देताना ही क्लिप आपली नसून कुणाचं तरी हे षडयंत्रं असल्याचं म्हटलं होतं. त्यांनतर आज पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.

Story img Loader