गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते रामदास कदम चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी भाजपा मित्रपक्षांना संपवू पाहतोय, असा गंभीर आरोप केला होता. रामदास कदमांच्या या आरोपानंतर भाजपा नेते नारायण राणे तसेच इतर नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. शिवसेना पक्षात फूट पडल्यासून रामदास कदम हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करताना दिसतात. दरम्यान, दापोली येथे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेत त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री तथा आमदार आदित्य ठाकरेंवर शेलक्या शब्दांत टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रभर फिरावं लागतंय, असे रामदास कदम म्हणाले. त्यांनी या सभेत उद्धव ठाकरेंना एक खुलं आव्हानही दिलंय.
“एकनाथ शिंदेंनीच उद्धव ठाकरेंना मोतोश्रीतून बाहेर काढलं”
“कोकणातील मच्छीमारांची आसवं पुसण्यासाठी उद्धव ठाकरे यांना वेळ नव्हती. आता मात्र ते सगळीकडे सभा घेत आहेत. ते सगळीकडे पळत आहेत. एकनाथ शिंदे यांनीच उद्धव ठाकरेंना पळायला लावलं. एकनाथ शिंदेंनीच उद्धव ठाकरेंना मोतोश्रीतून बाहेर काढलं. उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. मात्र ते फक्त दोन वेळा मंत्रालयात आले. आता मात्र ते मोठ्या गप्पा करत आहेत,” अशी खोचक टीका रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
“अफजलखान चालून येतो तशा पद्धतीने…”
“उद्धव ठाकरे हे १४ तारखेला दापोलीला येणार आहेत. माझं उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान आहे की हिंमत असेल तर मी ज्या ठिकाणी भाषण करतोय, त्याच ठिकाणी त्यांनी सभा घ्यावी. किती स्थानिक लोक तुमच्या सभेला येतात ते पाहा,” असं खुलं आव्हानच कदम यांनी उद्धव ठाकरेंना दिलं. तसेच उद्धव ठाकरेंनी फक्त महाराष्ट्रातून लोक भाड्याने आणू नये. त्यांनी खेडमध्ये सभा घेतली होती. या सभेसाठी त्यांनी उभ्या महाराष्ट्रातून लोक आणले होते. अफजलखान चालून येतो तशा पद्धतीने ते खेडला आले होते, असा टोलाही त्यांनी लगावला.