मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून शिंदेंच्या शिवसेनेतील खासदार गजानन कीर्तिकर आणि नेते रामदास कदम यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू होते. या वादाच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर रामदास कदमांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत बैठकीत झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली.
रामदास कदम म्हणाले, “भविष्यात कुठलेही वाद झाले, तर मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करावी. थेट प्रेसनोट काढून माध्यमांकडे जाता नये, अशी विनंती मुख्यमंत्र्याकडे केली आहे. तशा सूचनाही कीर्तिकरांना देण्यास सांगितलं आहे. दोन नेतेच आपापसांत भांडतात, हे चित्र भूषणावह नाही.”
“पक्षासाठी मी कफन बांधून लढलो”
“माझ्यावर गद्दारीचा शिक्का असल्याचं बोलणं आणि कुठलीही शहनिशा न करता मला राजकरणातून संपवण्यासाठी प्रेसनोट काढणं कितपत योग्य आहे? माझी हत्या करण्याची सुपारी अनेकांनी घेतल्या होत्या. पण, पक्षासाठी मी कफन बांधून लढलो आहे,” असं रामदास कदमांनी म्हटलं.
“मी कधीच कुणावर कमरेखाली हल्ला केला नव्हता”
“मी कांदिवलीचा शाखाप्रमुख होतो. माझ्या कामांवरती कीर्तिकर विधानसभेत निवडून आले होते. आता ३३ वर्षानंतर मी त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचा साक्षात्कार झाला. मी कधीच कुणावर कमरेखाली हल्ला केला नव्हता. अनंत गिते आणि माझ्या भावाला निवडणुकीत पाडल्याचं कीर्तिकरांनी सांगितलं. मग बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल. ज्याचं जळतं त्याला कळतं. तुम्हीतर कुठं स्वच्छ आहात?” असा संतप्त सवालही कदमांनी कीर्तिकरांना विचारला आहे.
“…तर मला काहीही अडचण नाही”
“भविष्यात कुठलेही आरोप करायचे नाहीत. तसं काही वाटलं, तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायची, असं ठरलं आहे. उत्तर-पश्चिममधून गजानन कीर्तिकर निवडणूक लढत असतील, तर मला काहीही अडचण नाही. मी त्यांच्या प्रचारासाठी सर्वात पुढे असेन,” असं रामदास कदमांनी स्पष्ट केलं.