माजी मंत्री आदित्य ठाकरे मागील काही दिवसांपासून शिंदे गटाच्या आमदारांवर जोरदार टीका करत आहेत. संबंधित आमदारांचा अनेकदा ‘गद्दार’ असा उल्लेख आदित्य ठाकरेंकडून केला जात आहे. तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे घटनाबाह्य आणि खोके सरकार असल्याची टीकाही ते करत आहेत. आदित्य ठाकरेंच्या या टीकेवरून माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी जोरदार टीकास्र सोडलं आहे.
उपरोधिक टोला लगावत रामदास कदम म्हणाले की, मी आदित्य ठाकरे यांच्यावर बोलणं फारसं उचित नाही. पण ‘सौ चुहा खा के बिल्ली हज चली’ असं व्हायला नको. आदित्य ठाकरेंचा या वयातही प्रचंड अभ्यास आहे. यासाठी त्यांचं अभिनंदन…” असा टोला रामदास कदमांनी लगावला आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
हेही वाचा- “धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटालाच मिळेल” बाळासाहेब ठाकरेंच्या नातूचं मोठं विधान, म्हणाले…
बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करणारा बॅनर लावला आहे. यावरून टीका करताना रामदास कदम पुढे म्हणाले की, स्वप्न बघायला कुणाची कसलीही अडचण नाही. त्यांनी स्वप्नामध्ये राहावं. शिवसेनेच्या आमदारांना संपवायचं त्यांचं स्वप्न होतं. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना कोट्यवधी रुपये दिले. शिवसेनेच्या आमदारांना संपवून त्यांना स्वत: मुख्यमंत्री व्हायचं होतं.
हेही वाचा- “….तर मी घरात घुसून मारेन,” अमेय खोपकरांचा शिवसेना नेत्यांना इशारा, पाहा VIDEO
पण ४० आमदारांना वेळीच हे सगळं कळालं. त्यामुळे त्यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंना ही बाब सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांना भेटायचा प्रयत्न केला. पण उद्धव ठाकरे त्यांना भेटले नाहीत, त्यांचं ऐकूनही घेतलं नाही. त्यामुळे आपली आमदारकी वाचवण्यासाठी संबंधित आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. म्हणून कदाचित आज त्यांची आमदारकी वाचेल. नाहीतर सगळे आमदार संपले असते, शिवसेनाही संपली असती. शिवसेनेला संपवून अजित पवार नक्की मुख्यमंत्री झाले असते. पण ४० आमदारांनी योग्य वेळी योग्य पाऊल उचललं. पण आदित्य ठाकरेंना आजही हे सगळं कळत नाही, हे आमचं दुर्दैव आहे. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. ४० आमदारांना बदनाम करण्याचा एककलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. पण शेंबडं पोरगही त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही” अशी टीका रामदास कदमांनी केली आहे.