काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या प्रश्नावरून सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी केली होती. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यू झाल्याची बातमी समोर आली. अजित पवारांच्या या आजारपणाचे विविध राजकीय अर्थ काढले जात आहेत. अजित पवारांना राजकीय डेंग्यू झाला, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. यानंतर आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही अजित पवारांवर टीकास्र सोडलं आहे.
मराठा समाज जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंगावर आला, तेव्हा अजित पवारांना डेंग्यू झाला, अशी उपरोधिक टीका रामदास कदम यांनी केली. त्याचबरोबर मराठा आरक्षणावरून सत्ताधारी पक्षातील अजित पवार गटाकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनावरही कदम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सत्ताधारी पक्षातील आमदार सरकारविरोधात आंदोलन कसं काय करू शकतात, हेच मला समजत नाही, असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा- “तक्रार करताना अजित पवार रडले, असं…”, अमित शाहांबरोबरच्या भेटीबाबत काँग्रेसच्या नेत्याचं मोठं विधान
अजित पवार गटाच्या हेतूंबाबत शंका उपस्थित करताना रामदास कदम म्हणाले, “उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार शरद पवारांचे आशीर्वाद घ्यायला गेले, हे आपण समजू शकतो. पण काल दिलीप वळसे पाटीलही पवारांकडे आशीर्वाद घ्यायला गेले. सुनील तटकरेही आशीर्वाद घ्यायला गेले आणि तिथून ते अमित शाहांना भेटायला दिल्लीत गेले. मराठा समाज जेव्हा एकनाथ शिंदेंच्या अंगावर आला, तेव्हा नेमका अजितदादांना डेंग्यू झाला. अजित पवारांचे २० पैकी २० आमदार एकनाथ शिंदे आणि शासनाच्या विरोधात मंत्रालयात आंदोलन करू लागले. त्यांनी मंत्रालयाचं गेट बंद केलं, हेच मला कळत नाही.”