मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. ते राज्यात विविध ठिकाणी जाऊन जाहीरसभा घेत आहेत. त्यांच्या सभेला मोठ्या संख्येनं लोक जमा होत आहेत. अशी एकंदरीत परिस्थिती असताना भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुणबी प्रमाणपत्र घेण्यास विरोध केला आहे. “९६ कुळी आणि कुणबी मराठा वेगळा आहे. कुठलाच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. मीही आयुष्यभर कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही,” असं वक्तव्य नारायण राणेंनी केलं. यानंतर आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही कुणबी प्रमाणपत्राला विरोध केला आहे.
सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, या मनोज जरांगे यांच्या मागणीला माझी मान्यता नाही. मी त्यांच्या विरोधातला आहे. कोकणातला एकही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, हे मी दाव्याने सांगू शकतो, असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
हेही वाचा- शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या कुटुंबातील सदस्याची राहत्या घरी आत्महत्या
मराठा आरक्षणावर भाष्य करताना रामदास कदम म्हणाले, “सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, ही मनोज जरांगेंची जी मागणी आहे, त्याला माझी मान्यता नाही. मी त्या मागणीच्या विरोधातला आहे. मला माहीत आहे, विदर्भात कुणबी आणि मराठ्यात सर्व व्यवहार चालतात. पण कोकणात कुणबी आणि मराठा यांच्यात रोटी-बेटीचा व्यवहार चालत नाही, याची कल्पना मनोज जरांगेंना नाही. त्यांचा सर्व महाराष्ट्राचा आणि कोकणाचा तेवढा अभ्यास नाही. त्यामुळे कोकणातला एकही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, हे मी दाव्याने सांगतो.”
हेही वाचा- VIDEO : “९६ कुळी अन् कुणबी मराठा वेगळाच, जरांगे-पाटलांनी…”, नारायण राणेंचं विधान
नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?
मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे म्हणाले, “मराठा आणि कुणबींमध्ये फरक आहे. जरांगे-पाटील मराठा आणि कुणबी एकच असल्याचं सांगतात. पण, तसं काही नाही. जरांगे-पाटलांनी जातीचा आणि घटनेचा अभ्यास करावा. मी मराठा आरक्षणाचा अभ्यास केला आहे. मात्र, जरांगे-पाटील कुणबी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय राहणार नाही, असं बोलत आहेत. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राची गरज नाही. मी मराठा असून, आयुष्यभर कधीच कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. ९६ कुळी आणि कुणबी मराठा वेगळा आहे.”