माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ओल्या दुष्काळाची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रति हेक्टर मदत द्यावी, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. या दौऱ्यावरून माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्र सोडलं आहे.
“शिंदे-फडणवीस सरकारने घोषणांची खैरात पण मदत मात्र दिली नाही” या उद्धव ठाकरेंच्या विधानाबाबत विचारलं असता, रामदास कदम म्हणाले, “ज्यांना कावीळ असते, त्यांना सगळी दुनिया पिवळी दिसते, तशी अवस्था आता उद्धव ठाकरेंची झाली आहे. ते मागील अडीच वर्षात मातोश्रीतून कधीही बाहेर पडले नाहीत. केवळ दोन ते तीन वेळा ते मंत्रालयात गेले होते. अडीच वर्षात त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही आणि त्याची अंमलबजावणीही केली नाही.”
“कोकणात वादळाचं मोठं संकट आलं होतं. यावेळी लाखों कुटुंबं उद्ध्वस्त झाली होती. या कुटुंबांचं अश्रू पुसण्यासाठी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे कोकणात गेले नाहीत. इतकं वय असतानादेखील शरद पवारांसारखे नेते मात्र नुकसानग्रस्तांची पाहणी करायला गेले. आदित्य ठाकरेही गेले नाहीत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्याचं पाहून मला आनंद झाला. पण त्यांना शेतीचा किती अभ्यास आहे, हे मला माहीत नाही. पण अजून परतीचा पाऊस पडत आहे. त्यामुळे अद्याप पंचनामे झाले नाहीत. जोपर्यंत पंचनामे होत नाहीत, तोपर्यंत मदत देता येत नाही, याची त्यांना कदाचित कल्पना नसेल. उद्धव ठाकरे केवळ दिखावा करण्यासाठी तिथे गेले, असं मला वाटतं” असा टोलाही रामदास कदमांनी लगावला.
हेही वाचा- “जेव्हा सैनिक कामचुकारपणा करतात, तेव्हा…” सुषमा अंधारेंचा शिंदे गटातील नेत्यांना टोला
“माझं अंत:करणातून एक मागणं आहे. अजित पवारांनी आता विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा आणि ही जबाबदारी उद्धव ठाकरेंनी आपल्या हाती घ्यावी, असं मला आता वाटतं” असंही कदम म्हणाले. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.