दापोली : दरवर्षीप्रमाणे यंदाही खेड तालुक्यातील जामगे गावातील घरात गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करताना शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची टीकेची तोफ कडाडण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. काही महिन्यांपूर्वी पक्षश्रेष्ठींकडून अन्याय झाल्याबद्दल प्रसिद्धीमाध्यमांसमोर रडत भावना व्यक्त करणाऱ्या कदम यांनी आता स्वत:ची ताकद पुन्हा सिद्ध केल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहेत.

  जामगे येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांनाच दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे. खोके, खोके म्हणून आज मातोश्रीचे समर्थक आम्हाला हिणवतात. पण आम्हालाही मातोश्रीवर किती मिठाईचे खोके पोचत होते, हे ठाऊक आहे, असे सांगत कदम यांनी त्याद्वारे विरोधकांना आम्हालाही प्रसंगी रडविता येईल, असा गर्भित इशाराच दिला.

  दरम्यान, शिवसेनेचे हेवीवेट नेते अनिल परब आणि सदानंद कदम यांच्याशी संबंध असलेल्या मुरुड येथील साई रिसॉर्ट पाडण्याची कारवाई लवकरच होणार आहे. वर्षभरापूर्वी त्याबाबत रामदास कदम यांची मोबाइल संभाषणाची ऑडिओ क्लिप वायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली. दापोली, मंडणगड, खेडातच नव्हे तर मु़ंबई, ठाण्यातही त्यांच्या विरोधकांनी गद्दार म्हणत बॅनरबाजी केली. तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने अनिल परब आणि रामदास कदम थेट आमनेसामने झाले. परब हे उद्धव ठाकरे निकटवर्तीय समजले जातात. विशेष म्हणजे ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांचा बंगलाही मुरुड येथे बांधण्यात आला होता. किरीट सोमैय्या यांच्या आरोपानंतर तो लगेच पाडून टाकण्यात आला. पण आता साई रिसॉर्टचे मालक असलेले सदानंद कदम हे रामदास कदम यांचे भाऊ असून एकमेकांचे हाडवैरी आहेत. परब यांनी सदानंद कदम यांना जागा विकत त्यांच्याशी व्यावसायिक दोस्ती करण्यामागे रामदास कदम यांना शह देण्याचाच घाट होता. पण आता सत्तापालट होऊन रिसॉर्ट पाडण्याच्या कारवाईला वेग आल्याने रामदास कदम यांनी शहकाटशहात परब- कदम यांना मात दिल्याचे राजकीय निरीक्षकांत बोलले जात आहे.

Story img Loader