Ramdas Kadam On Ladki Bahin Yojana: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काल राज्याचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी पुरेशी तरतूद केली नसल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी टीका केली आहे. याचबरोबर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनीही विधानसभेत बोलताना, हळूहळू सरकार लाडकी बहीण योजनेतून दहा लाख महिलांना कमी करणार असल्याचा दावा केला आहे.

अशात आता माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कमद यांनी, “एक लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी दहा योजना चालू करता येतील की”, असे म्हटले आहे. कदम यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

एक लाडकी बहीण बंद केली तर…

“शेवटी बजेट डोळ्यासमोर ठेऊन सगळ्या योजना चालू कराव्या लागतात, अंथरुन पाहूनच पाय पसरावे लागतात. आज आपण लाडकी बहीण योजनेचे बजेट पाहीलं, तर ते तीस हजार कोटींपेक्षा जास्त आहे. या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेऊन आपल्याला विकासाची वाटचाल करावी लागते आणि एक लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी दहा योजना पण चालू करता येतील की”, असे टीव्ही ९ मराठीशी बोलताना रामदास कदम म्हणाले.

राज्यातील पाच लाख महिला अपात्र

राज्यातील महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील निकषांचे उल्लंघन करीत गैरफायदा घेणाऱ्या पाच लाख बहिणींना सरकारने अपात्र ठरवले आहे. त्यांच्याकडून सहा महिन्यांच्या अनुदानाची प्रत्येकी नऊ हजार रुपयांची रक्कम वसूल केली जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. दरम्यान, लाभार्थी महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्याची प्रक्रिया यापुढेही चालू राहील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते.

कोणत्या महिला ठरणार अपात्र?

दरम्यान यापूर्वी राज्याच्या कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांनी जानेवारीमध्ये, उत्पन्नात वाढ झाली असेल, अडीच लाखाच्या वर उत्पन्न गेलं असेल, कुटुंबात चारचाकी असलेल्या महिला, आंतरराज्य विवाह केलेल्या महिला यासह आधार कार्डवरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळे असेल आणि ते लक्षात आणून दिल्यास ती संबंधित महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरणार असल्याचे स्पष्ट केले होते.

Story img Loader