शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आज शिवसेना(ठाकरे गट) नेते अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेना फोडण्याचं पाप अनिल परब यांनी केलं आहे, दिवस बदलत असतात आणि ते तुम्ही आता भोगताय. असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
प्रसारमाध्यमांना प्रतिक्रियात देताना रामदास कदम यांनी दावा केली की, “शिवसेनेचा सत्यानाश, शिवसेना फोडण्याचं पाप आणि उद्धव ठाकरेंना चुकीचे सल्ले देण्याचं पाप अनिल परबांनी केलं आहे. अनिल परबांमुळेच सगळी शिवसेना फुटली आहे. हे सगळं पाप त्यांचं आहे.
हेही वाचा – “याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार गेले, पक्षाची…” आशिष शेलारांची संजय राऊतांवर टीका!
याचबरोबर “दिवस बदलत असतात म्हणूनच मुख्यमंत्री पदावरून खाली उतरावं लागलं. माझ्या मुलाला जो त्रास दिला तो मरेपर्यंत मी कदापि विसरणार नाही. जो मला त्रास दिला आहे तो मरेपर्यंत मी कदापि विसरणार नाही. हेच माझं म्हणणं आहे की होय दिवस बदलत असतात आणि ते तुम्ही आता भोगताय, अनुभवताय. मी हेदेखील सांगतो की या ४० आमदारांपैकी एकही आमदार पडणार नाही.” असा विश्वासही यावेळी रामदास कदम यांनी व्यक्त केला.
याशिवाय, “त्यांचं जे सुरू आहे ना खोके-खोके, गद्दार-गद्दार, कुणी केली गद्दारी? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बेईमानी आणि गद्दारी करण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं आहे. उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले आहेत आणि काँग्रेस, राष्ट्रवादीकडे शिवसेना गहाण ठेवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे.” असा आरोप रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.