Ramdas Kadam Slams Aditya Thackeray in Shinde Shivsena Dapoli Public Meeting : शिवसेनेचे (शिंदे) नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी शनिवारी (११ जानेवारी) दापोली येथील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व वरळीचे आमदार तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. रामदास कदम म्हणाले, “ते पिल्लू, त्याला पेंग्विन म्हणतात, तो हल्ली कुठे जातोय माहिती आहे का? कोणाला भेटतोय माहिती आहे का? तो देवेंद्र फडणवीस यांना भेटतोय. तो फडणवीस यांना का भेटतोय ते सांगू का? सांगतो ऐका… दिशा सालियान नावाच्या एका मुलीने आत्महत्या केली होती ते प्रकरण तुम्हाला माहीत असेलच, ते प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनी बाहेर काढलं तर याला बर्फाच्या लादीवर झोपवतील आणि फटके देतील. या भीतीमुळे तो देवेंद्र फडणवीस यांना भेटतोय. कुठे फटके देतील ते मी सांगितलं नाही. मी इतकं काही बोललो नाही. तो केवळ आता स्वतःला वाचवण्यासाठी देवा भाऊ.. देवा भाऊ… असा जप करतोय”.
रामदास कदम म्हणाले, “मघाशी श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं की या महाविकास आघाडीवाल्यांची सगळी तयारी झाली होती. यांचं खातेवाटपही झालं होतं. पालकमंत्रिपदांचं वाटप निश्चित झालं होतं. हॉटेल बूक झालं होतं. त्यांना वाटत होतं की आपली सत्ता आलीच आहे. त्याचदरम्यान तो पेंग्विन दापोलीत येऊन काय म्हणाला? माझी सत्ता आली तर मी या लोकांना बर्फाच्या लादीवर झोपवून फटके देणार. आता मला त्याला प्रश्न विचारायचा आहे की आता कोणाला बर्फाच्या लादीवर झोपवणार? मी देवेंद्र फडणवीस यांना एकच गोष्ट सांगेन की आम्ही त्या लोकांबरोबर (ठाकरे) ५५ वर्षे काढली आहेत. देवेंद्र फडणवीसजी तुम्हाला आई तुळजाभवानीची शपथ आहे. या सापांना जवळ करू नका. त्यांना कितीही जवळ घेतलं तरी ते विष ओकल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे यांना सोबत घेऊ नका. ते तुमच्या पायावर डोकं ठेवतील, तरीदेखील त्यांना जवळ करू नका.
“तुमचा स्वाभिमान गहाण ठेवला आहे का?” रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
शिवसेनेचे (शिदे) नेते रामदास कदम म्हणाले, “मी देवेंद्र फडणवीस यांना इतकंच सांगेन की हे लोक एक दोन वेळा नव्हे तर दहा वेळा तुमच्या पायावर डोकं ठेवतील. तरी त्यांना जवळ करू नका. मला उद्धव ठाकरे यांना विचारायचं आहे की आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला आहे? तुम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोललात, अमित शाह यांच्यावर टीका केलीत. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीत आणि आता त्याच देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही भेटताय. तुम्ही तुमचा स्वाभिमान गहाण ठेवला आहे का? फडणवीसांना भेटताना तुम्हाला लाज वाटत नाही का?