भाजपने सर्व ‘ओपिनियन पोल’ मॅनेज केले असल्याची टीका विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते व शिवसेनेचे उपनेते रामदास कदम यांनी शुक्रवारी येथे केली. राज्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप या नव्या युतीचा ‘आम्ही तिघे भाऊ आपसात मिळून खाऊह्ण हा नारा असल्याचेही ते म्हणाले.
शिवसेना उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ रामदास कदम यांची न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानावर जाहीर सभा झाली. याप्रसंगी रामदास कदम यांनी राज्यातील कॉंग्रेस आघाडीच्या भ्रष्टाचाराचे किस्से सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी दिलेले पैसे को-ऑपरेटीव्ह बॅंकेच्या माध्यमातून गिळंकृत केले. पवार कुटुंबीयांना इतकी तहान लागली की, सिंचनाचे पाणी पैशासकट पिऊन टाकले आणि आता ते शेतकऱ्यांनाच लघुशंका करण्याचा सल्ला देत आहे. आदर्शपासून तर विवाहीत आदिवासी मुलांना वाटप केल्या जाणाऱ्या मंगळसूत्रापर्यंतचा पैसा अक्षरश: खाऊन टाकला. राज्यातील कॉंग्रेस आघाडीचे सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला होता. आता या सरकारची शंभर पापे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या हाती संपूर्ण सत्ता सोपविण्याचे आवाहन केले.
यावेळी कदम यांनी भाजपवर सडकून टीका केली. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याची घाई झालेली आहे. त्यामुळेच त्यांनी युती तोडली असून आता ओपिनियन पोल मॅनेज करून राज्यात सत्तेत येण्याचा प्रयत्न करीत आहेत. ओपिनियन पोल कशा पध्दतीने मॅनेज होतात, हे सुध्दा कदम यांनी सांगितले. त्यामुळे मतदारांनी त्यात दाखविलेल्या भाजपच्या फुगीर आकडय़ांचा फुगा फोडावा, असेही त्यांनी आवाहन केले. याप्रसंगी सेना उमेदवार जोरगेवार यांनीही मार्गदर्शनपर भाषण केले.
मोदींमुळे हेलिकॉप्टरची परवानगी नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉफ्टर जोपर्यंत आकाशात उड्डाण घेत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला हेलिकॉप्टर देणार नाही, असे सांगण्यात आल्यामुळे आपण खासगी गाडीने चंद्रपूरला आलो. मोदींच्या सभेमुळे सेनेला हेलिकॉप्टरची परवानगी सुध्दा मिळत नसल्याची टीका रामदास कदम यांनी यावेळी केली.

Story img Loader