राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अध्यक्ष पदावरून पायउतार झाले आहेत. त्यांनी ‘लोक माझा सांगाती’ या आपल्या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात अचानक आपली निवृत्ती जाहीर केली. शरद पवारांच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे. शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. पण अद्याप शरद पवार आपल्या राजीनाम्यावर ठाम आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी मोठं विधान केलं आहे. शरद पवारांनी राजीनामा देऊन एका दगडात दोन पक्षी मारले, असं विधान रामदास कदम यांनी केलं आहे. तसेच राजीनामानाट्यातून शरद पवारांनी अजित पवारांना चपराक लगावली आहे. त्यांनी अजित पवारांना उघडं पाडलं, अशी टिप्पणी रामदास कदम यांनी केली. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

हेही वाचा- “भाजपावाले चोर आणि लफंगे आहेत, ते कधी…”, बेळगावातून संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल!

यावेळी रामदास कदम म्हणाले, “शरद पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारले. त्यांनी दाखवून दिलं की, महाराष्ट्रातील आणि देशातील राष्ट्रवादीची जनता माझ्याबरोबर आहे. अजित पवार तुमच्याबरोबर नाहीये. त्यांनी अजित पवारांना उघडं पाडलं, एकाकी पाडलंय. मधल्या काळात अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू होती. त्यासाठी काही आमदारांच्या भेटीगाठीही सुरू होत्या. त्यामुळे शरद पवारांनी राजीनामा देत अजित पवारांना दाखवून दिलं की, हा पक्ष माझा आहे, तुझा नाही. तुझ्याबरोबर कुणीही नाही.”

हेही वाचा- अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत दोन गट पडले? जयंत पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

दुसरीकडे, राज्याचा भावी अध्यक्ष म्हणून अजित पवारांचं नाव चर्चेत आहे, याबाबत विचारलं असता रामदास कदम पुढे म्हणाले, “मला त्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. पण शरद पवारांनी खऱ्या अर्थाने अजित पवारांना चपराक लावली आहे. हा पक्ष माझा आहे, मी पक्षाचा प्रमुख आहे. राज्यातील आमदार आणि जनता माझ्याबरोबर आहे. तुम्ही एकाकी आहात. वेळ पडली तर मी तुम्हाला उचलून बाजुला ठेवू शकतो, हे शरद पवारांनी दाखवून दिलंय.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas kadam statement on sharad pawar resignation as ncp chief and ajit pawar political power within party rmm