Ramdev Baba : औरंगजेब हा लुटारु होता त्याचं कुटुंब लुटारु होतं. भारत लुटायला तो आणि त्याचं खानदान चालून आलं होतं त्याचा आदर्श आपल्यापुढे कसा काय असेल? आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत असं योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. नागपुरात पतंजलीच्या फूड पार्कच्या उद्घाटन प्रसंगी रामदेव बाबा बोलत होते.
महाराष्ट्रात औरंगजेबाची चर्चा का?
छावा चित्रपट आल्यापासून महाराष्ट्रात औरंगजेबाची चर्चा रंगली आहे. त्याचप्रमाणे अबू आझमी यांनी औरंगजेब क्रूर नव्हता तो उत्तम प्रशासक होता असं वक्तव्य केलं. त्यामुळे त्यांचं अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे. दरम्यान नागपूरच्या कार्यक्रमात रामदेवबाबांनी औरंगजेब आमचा आदर्श असूच शकत नाही असं म्हटलं आहे.
रामदेवबाबा काय म्हणाले?
“औरंगजेब भारताचा आदर्श असूच शकत नाही, तो क्रूर होता. औरंगजेब लुटारु होता त्याचं कुटुंब लुटारु होतं. बाबर काही भारतात काही घडवायला आला नव्हता. बाबर, अकबर, औरंगजेब त्यांची मुलं या सगळ्यांनी हरम तयार केले. आपल्या हजारो आया-बहिणींची त्यांनी बेअब्रू केली. आपल्या देशाची ओळख पुसण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अशी माणसं आपला आदर्श असूच शकत नाहीत. आपला सगळ्यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत, औरंगजेब आमचा आदर्श असूच शकत नाही.” असा योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.
ट्रम्प यांच्याविषयी काय म्हणाले रामदेवबाबा?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवरही भाष्य केलं आहे. ट्रम्प यांनी टेरिफ टेररिझमचा नवीन पायंडा पाडला आहे. त्यांनी लोकशाही पायदळी तुडवली आहे. ते वर्ल्ड बँकचंही ऐकत नाहीत. डॉलरची किंमत वाढवली, गरीब विकसनशील देशांच्या पैश्यांची किंमत कमी करून एक प्रकाराने आर्थिक दहशतवाद डोनाल्ड ट्रम्प चालवत आहेत. ट्रम्प, पुतीन, शी जिनपिंग यांचा भरवसा नाही. भारताला विकसनशील बनवलं पाहिजे. काही शक्तीशाली देश जगाला विनाशाकडे नेण्याचा काम करत आहेत. त्यासाठी भारतीयांनी एकजुटीने सशक्त राष्ट्र निर्माण करत विध्वंसक ताकदीला उत्तर दिले पाहिजे, असं आवाहन रामदेवबाबांनी केलं.
फूड पार्कबाबतही रामदेवबाबांचं भाष्य
रामदेवबाबांनी याच वेळी फूड पार्कवरही भाष्य केलं. या फूड पार्कची रोजची क्षमता ८०० टन इतकी आहे. यातून नैसर्गिक पद्धतीने ज्यूस तयार करून मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना समृद्धी मिळणार आहे. आज संत्र्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या पद्धतीचे रोपे तयार करण्यासाठी नर्सरी तयार करू. अन्य प्रकारची जी फळं आहेत, त्यांचाही नैसर्गिक पद्धतीने ज्यूस काढण्याचं काम करू. संत्री निर्यात करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू. विदर्भला लागून गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान लगतच्या राज्यातून संत्रा आणण्यासाठी जाऊ, असं सांगतानाच जय जवान, जय किसान, जय मिहान हे महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करू, असंही रामदेवबाबा म्हणाले.