किती दिवस खासदार चंद्रकात खैरेंना सहन करायचे, असा सवाल करत माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांनी प्रचारात सक्रिय होण्याचे संकेत दिले. सध्या पैठण येथे ते पारायणाला बसले आहेत. ते संपल्यानंतर लगेच उमेदवाराचा प्रचार सुरूकरू, असे त्यांनी म्हटले. नितीन पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर रामकृष्णबाबा यांची भूमिका कशी असेल, या विषयी उत्सुकता होती.
 काँग्रेसची उमेदवारी नितीन पाटील यांना दिल्यानंतर मताचे ध्रुवीकरण जातीच्या अंगाने होईल, असे मानले जात होते. माजी जिल्हाध्यक्ष सदाशिवराव गायके यांनी जातीच्या मतांचे ध्रुवीकरण होईल, असे उत्तमसिंह पवार यांच्या बंडखोरीच्या सभेत जाहीर वक्तव्यच केले होते. या पाश्र्वभूमीवर रामकृष्णबाबांची भूमिका महत्त्वाची मानली जात होती. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सध्या मी पारायणात आहे. पण सांगा, किती दिवस खैरेंना सहन करायचे?  काँग्रेसच्या उमेदवाराला आता सहकार्य करायला हवे, असेही ते म्हणाले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील व रामकृष्णबाबा यांच्या संबंधावरून नाना प्रकारच्या चर्चा औरंगाबाद जिल्हय़ात काँग्रेसच्या गोटात असतात. उमेदवार नितीन पाटील हे सुरेश पाटील यांचे चिरंजीव असल्याने रामकृष्णबाबांची भूमिका काय, याची उत्सुकता त्यामुळेच होती.
  आणीबाणीनंतर औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत १९९६ मध्ये काँग्रेसकडून निवडून आलेले ते एकमेव खासदार आहेत. काँग्रेसमध्ये सर्वाधिक मते मिळविण्याचा मानही त्यांच्याकडेच आहे. गत आठ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतदानाची सरासरी टक्केवारी ३७.४० होती. त्यामुळे ते कसा प्रचार करतील, यावर बरेच अवलंबून असल्याने सुरेश पाटील व नितीन पाटील यांनी त्यांची आवर्जून भेट घेतली. या वेळी आमदार सुभाष झांबड हे उपस्थित होते. पारायण संपल्यानंतर काँग्रेसच्या प्रचाराला वेग येईल, असे सांगितले जात आहे.

Story img Loader