सातारा : १९९९ ला शरद पवार यांना पंतप्रधान करण्याची स्वप्ने आम्ही बघितली होती. त्याचप्रमाणे आता अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी साताऱ्यात सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नुकताच साताऱ्याचा दौरा केला. यानंतर त्याच भागात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला व त्यांची मते जाणून घेतली. यावेळी रामराजे बोलत होते.
हेही वाचा – “आम्ही गोट्या खेळायला आलोय का?” फडणवीसांच्या उपस्थितीत अजित पवारांचा सवाल
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे यांच्या निवासस्थानी दहिवडी (ता. माण) येथे बैठक झाली. यावेळी सातारा जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, सुरेंद्र गुदगे, अर्जून खाडे, संदीप मांडवे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
रामराजे म्हणाले, भविष्यातील राजकारण विकासाचे ठेवण्यासाठी आम्ही हा कटू निर्णय घेतला आहे. २१ व्या शतकात सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला देशातील प्रमुख राज्य करण्याचा ध्यास अजित पवार यांनी ठेवला आहे. खासदार शरद पवार यांनीही विकासाचे राजकारण शिकवले. १९९९ ला आम्ही सर्वांनी त्यांना पंतप्रधान करण्याची स्वप्ने बघितली होती. त्याप्रमाणे अजित पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.
रामराजेंनी आता जिल्ह्याच्या राजकारणात न थांबता दिल्लीतील राजकारणात जावे, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्ही गावागवात पोहोचवू. सध्या माण तालुक्यात दुष्काळ सदृश्य टंचाई परिस्थिती आहे. त्यामुळे या परिसरात तातडीने दुष्काळ व टंचाई जाहीर करावी, अशी मागणी केली.