सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुन्हा एकदा आपण पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फलटण शहर व फलटण कोरेगाव मतदारसंघाच्या विकासासाठी मोठे योगदान दिलेले असल्याने त्यांची साथ सोडणार नसल्याचे रामराजे यांनी सांगितले. यामुळे रामराजे लवकरच तुतारी हाती घेणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान रामराजे पक्षातच राहणार असले तरी त्यांचे बंधू ,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण हे मात्र सोमवारी (दि. १४) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश करणार आहेत. दुसरीकडे रामराजे पक्ष सोडणार नसले तरी ते प्रचारापासून मात्र अलिप्त राहणार असल्याचेही त्यांनी आज जाहीर केले.
फलटण येथील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपली ही भूमिका जाहीर केली. या वेळी आमदार दीपक चव्हाण व संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते. महायुतीत नेतेमंडळीकडून अडवणूक होत आहे. कार्यकर्त्यांना सन्मान मिळत नाही, अशी तक्रार करत रामराजे गटाच्या कार्यकर्त्यांनी मेळावा घेत पक्षांतराची मागणी केली होती. मात्र, यावेळी रामराजे यांनी पक्षांतर करणार नसल्याचे जाहीर केले. मात्र, राजकीय सोयीसाठी आपल्या कार्यकर्त्यांच्या पक्षांतरास मान्यता दिली. यामुळे गेले अनेक दिवस सुरू असलेल्या रामराजेंच्या पक्षांतराच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, मतदारसंघातील विकासकामांसाठी मोठा निधी मिळालेला आहे. मात्र, मतदारसंघातील अन्य महायुतीच्या नेत्यांसोबत असलेल्या मतभेदामुळे हा निर्णय घेतल्याचे संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.