राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यत्वासाठी अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष रामराव वडकुते यांची राष्ट्रवादीने नियुक्ती केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने सामाजिक समीकरणांची जुळवाजुळव चालू केली असून लोकसभा निवडणुकीत महायुतीला निर्णायक यश मिळवून देणाऱ्या धनगर समाजाला आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला असल्याचे मानले जात आहे. दोन्ही काँग्रेसने ज्या दहा नावावर शिक्कामोर्तब केले त्यात वडकुते हे मराठवाडय़ातील एकमेव नेते आहेत.
परभणी जिल्ह्याच्या राजकारणात वडकुते एक कार्यकत्रे म्हणून सुरुवातीपासूनच सक्रिय आहेत. माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांचे निष्ठावंत कार्यकत्रे म्हणून प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर त्यांनी धनगर समाजाच्या कामासाठी स्वतला वाहून घेतले. २००२ मध्ये  राष्ट्रवादीने वडकुते यांची महाराष्ट्र राज्य शेळी मेंढी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. या नियुक्तीच्या काळातच त्यांनी महामंडळास अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात वडकुते यांचे गाव आहे. त्या दृष्टीने त्यांनी या मतदारसंघात काम सुरू केले. या मतदारसंघाच्यानिमित्ताने त्यांनी िहगोली जिल्हा हे आपले कार्यक्षेत्र निवडून िहगोलीतच वास्तव्य सुरू केले. २००४ मध्ये वडकुते यांना राष्ट्रवादीने विधानसभेची उमेदवारी दिली. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पुढे २००९च्या विधानसभा निवडणुकीत वडकुते यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजीव सातव यांच्यासाठी काँग्रेस पक्षाने ही जागा स्वतकडे घेतली. त्यावेळी वडकुते यांच्यावर अन्याय झाला होता. पक्षानेही त्यांना तसे आश्वासन देत आपल्या या त्यागाचा पुढे विचार केला जाईल असा शब्द दिला होता. दरम्यानच्या काळात २०१२ मध्ये  वडकुते यांची पुन्हा शेळी मेंढी विकास मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. या महामंडळाच्या अध्यक्षपदावरुन काम करताना त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले. दर्यापूर, चाकन, तुळजापूर, कळमनुरी, भंडारा या पाच ठिकाणी प्रत्येकी ७५ लाख रुपये खर्च करुन शेळ्यांच्या बाजारासाठी अद्ययावत सोयी निर्माण करून देण्यात आल्या.
वडकुते यांची नियुक्ती करताना पक्षाने धनगर समाजाची मते डोळ्यासमोर ठेवली आहेत. महादेव जानकर यांच्या रुपाने महायुतीत एक महत्त्वाचा शिलेदार दाखल झाल्याने धनगर समाजाची मते लोकसभेला महायुतीच्या पारडय़ात वळली होती. आता या मतांवर डोळा ठेवून राष्ट्रवादीनेही सामाजिक समीकरण राखण्याचा प्रयत्न केला आहे, असे मानले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा