आरक्षणासाठी महाराष्ट्र बंद करण्याचानीलेश राणेंचा इशारा
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळण्यासाठी प्रसंगी मुंबईसह महाराष्ट्र बंद करू, असा इशारा माजी खासदार नीलेश राणे यांनी दिला आहे.
कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याची जोरदार शिफारस केली होती. पण त्यानंतर थोडय़ाच काळात कॉंग्रेस आघाडीची सत्ता जाऊन राज्यात भाजपा-सेना युतीचे सरकार आले. या सरकारने या विषयावर काहीच कारवाई न केल्यामुळे राणेंचे चिरंजीव नीलेश यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विधिमंडळावर मराठा समाजाचा भव्य मोर्चा राणेंच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे. त्या दृष्टीने वातावरणनिर्मितीसाठी नीलेश यांनी आखलेल्या राज्यव्यापी दौऱ्याचा नारळ रत्नागिरीत फोडण्यात आला. यावेळी आयोजित मेळाव्यात बोलताना ते म्हणाले की, आम्ही फकत शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मागितले आहे. कारण ते मिळाले नाही तर मराठा समाजाची एक पिढी बरबाद होईल. म्हणून या मुद्यावर संपूर्ण समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याची या सरकारची इच्छाशक्तीच नाही. त्यामुळे न्यायालयाच्या अवमानाचे कारण पुढे केले जाते. सर्वोच्च न्यायालयात त्याबाबत अनुकूल निर्णय न लागण्यासही हेच कारण आहे. म्हणमन या सरकारला जाग आणण्यासाठी मी राज्यव्यापी दौरा करणार आहे. राज्यभरातील मराठा समाजाला संघ्टित करण्याचा हेतू त्यामागे आहे. तसे झाले तरच आपल्याला अपेक्षित बदल घडून येईल. मात्र सरकारने हे आरक्षण दिले नाही तर मुंबईसह महाराष्ट्र बंद केला जाईल. सर्वश्री केशवराव भोसले, केशवराव इंदुलकर, माजी आमदार आप्पा साळवी, राजन देसाई, मधुकर दळवी इत्यादी मराठा समाजाची सर्वपक्षीय नेतेमंडळी या मेळाव्याला उपस्थित होती.
राणेंचे मराठा कार्ड
कोकणासह राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा महत्त्वाचे स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या नारायण राणे यांनी आता त्यासठी मराठा कार्डचा वापर करण्याचे धोरण अवलंबले असल्याचे या मेळाव्याच्या निमित्ताने स्पष्ट झाले. त्याचबरोबर पक्षसंघटनेच्या राज्य पातळीवर नीलेश यांना स्थान मिळवून देण्यासाठी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर स्वत:ऐवजी त्यांचा राज्यव्यापी दौरा आयोजित करण्यात आल्याचे दिसून येत आहे.