काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांनी ब्रिटिशांकडे माफी मागितल्याचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर सावरकरांचे नातू रणजीत सावरकरांनी भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंवर गंभीर आरोप केले आहेत. “नेहरूंनी एका बाईसाठी भारताची फाळणी मान्य केली आणि १२ वर्षे भारताची गुप्त माहिती ब्रिटिशांना दिली,” असा गंभीर आरोप रणजीत सावरकरांनी केला. तसेच यावर आता राहुल गांधींनी उत्तर द्यावं, अशी मागणी केली. ते शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
रणजीत सावरकरांनी आरोप केला, “पंडित जवाहरलाल नेहरूंनी एका बाईसाठी भारताची फाळणी मान्य केली. १२ वर्षे भारताची सर्व गुप्त माहिती ब्रिटिशांना दिली. माझी मागणी आहे की, नेहरू-एडवीना पत्रव्यवहार ब्रिटिशांकडे मागावा आणि ते सर्व जाहीर करावं. त्यानंतरच जनतेला कळेल की, ज्यांना आपण चाच नेहरू म्हणतो त्या नेत्याने देशाची कशी फसवणूक केली.”
“माझी आणि त्यांची चांगली मैत्री झाली”
“९ मे ते १२ मे १९४७ नेहरू एकटेच शिमलाला गेले. तिथं ते कुटुंबासोबत चार दिवस राहिले. त्याबाबत एडवीनाने ब्रिटिश सरकारला लिहिलेल्या पत्रात लिहिलं आहे की, मी नेहरूंना आपले पाहुणे म्हणून बोलावलं. ते अती व्यग्र असल्याने ते ‘नर्व्हस ब्रेक डाऊन’कडे येत आहेत. त्यांनी चार दिवस माझ्यासोबत घालवले. माझी आणि त्यांची चांगली मैत्री झाली. ही मैत्री खूप मोठा काळ टिकेल,” असा दावा रणजीत सावरकर यांनी केला.
“एडवीना यांनी नेहरू माझ्या नियंत्रणात आलेत असं सांगितलं”
“यातून एडवीना यांनी नेहरू माझ्या नियंत्रणात आलेत असं ब्रिटिश सरकारला सांगितलं. अधिकृत रिपोर्टमध्ये मैत्रीची भाषा लिहिली जात नाही. हा सरकारी रिपोर्ट आहे,” असा दावा सावरकरांनी केला.
“भारतातील २० हजार मुलींचं अपहरण”
रणजीत सावरकर पुढे म्हणाले, “स्वातंत्र्यानंतर नेहरुंनी माऊंटबॅटन यांना व्हाईसरॉय म्हणून नियुक्त केलं. माऊंटबॅटन व्हॉईसराय असल्यामुळेच बलवंत सिंग सांगतात की पाकिस्तानमध्ये सैन्य पाठवू शकत नाही. भारतातील २० हजार मुलींचं अपहरण होऊन त्या पाकिस्तानमध्ये होत्या. तिथं सैन्याच्या दोन तुकड्या पाठवणं काय कठीण होतं. असं असताना व्हॉईसरॉयने सैन्य पाठवू दिलं नाही. त्यावेळी नेहरू तर राज्यकारभार काहीच पाहत नव्हते. तेव्हा सर्व निर्णय व्हाईसरॉयच घेत होते.”
“नेहरूंनी १२ वर्षे दररोज आपला रिपोर्ट पाठवला”
“माऊंटबॅटन यांनी लिहिलंय की, हत्याकांड पाहून भारतीय नेत्यांना काय करावं कळत नव्हतं त्यामुळे मी नियंत्रण हातात घेतलं. बाहेरच्या लोकांना नियुक्त करण्याची काय गरज होती. माऊंटबॅटन भारतातून गेल्यावर नेहरूंनी १२ वर्षे दररोज आपला रिपोर्ट पाठवला असं माऊंटबॅटनने लिहिलं आहे. हे गुप्तचर संस्थांचं मोठं अपयश आहे,” असा आरोप रणजीत सावरकरांनी केला.
“नेहरुंना हनीट्रॅपमध्ये फसवण्यात आलं होतं”
त्यांनी पुढे आरोप केला, “नेहरुंना हनीट्रॅपमध्ये फसवण्यात आलं होतं. ते त्यात फसले. हा तर गुन्हा आहे. मागील काही काळात अनेक लोकांना तसं पकडण्यात आलं, तर शिक्षा झाली. नेहरूंविषयी कोण बोलणार मग? १२ वर्षे झालेल्या हनीट्रॅपवर राहुल गांधींनी उत्तर दिलं पाहिजे.”
हेही वाचा : “राहुल गांधी सत्यच बोलले, एकेकाळी सावरकर…”; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींनी केली पाठराखण!
“मोदींनी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करावी”
“मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन करतो की, या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हावी. लेडी माऊंटबॅटन कलेक्शन इंग्लंडमध्ये उपलब्ध आहे. मात्र, त्यावर एक खटला सुरू असल्याने ती पत्रे बाहेर येत नाहीत. भारत सरकारने त्या सर्व कागदपत्रांची मागणी करावी. तसेच भारतातून इंग्लंडला किती गुप्त माहिती देण्यात आली त्याचा तपास करावा,” अशी मागणीही रणजीत सावरकरांनी केली.