Bharat Jodo Yatra Maharashtra Rahul Gandhi: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधींना अटक करण्याची मागणी रणजीत सावरकर यांनी केली आहे. सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर यांनी यावेळी उद्धव ठाकरेंनी सावरकरांबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीदेखील केली आहे. तसंच सावरकरांना भारतरत्न द्यावा ही आमच्या कुटुंबाची मागणी नसल्याचं त्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलतना स्पष्ट केलं आहे.
“सावरकरांची बदनामी केली तर आपल्याला मतं मिळतील असा राहुल गांधींचा समज आहे. पण यातून ते एका देशभक्तावर खोटे आरोप करत बदनामी करत आहेत. याआधीही त्यांनी असे उद्योग केले आहेत,” अशी टीका त्यांनी केली आहे. आपण दादर पोलीस ठाण्यात तक्रार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
“राहुल गांधींना अटक केली पाहिजे. कारण याच महाराष्ट्रात शरद पवारांवर ट्वीट रिट्वीट केल्याबद्दल एका अभिनेत्रीला एक महिना तुरुंगात ठेवलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रात सावरकरांचा असा अपमान होणार असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे,” असं ते म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की “राहुल गांधींनी प्रचारासाठी यात्रा काढली असेल तर काढावी. पण जर यातून फक्त देशभक्तांचा अपमान करण्याचे उद्योग होणार असतील तर या यात्रेवर बंदी घातली पाहिजे. काँग्रेसनेच हा पायंडा घातला आहे. शरद पवारांवर टीका होते तेव्हा ती व्यक्ती जेलमध्ये जातो. शरद पवारांची झालेली बदनामीही चुकीची होती. पण जो न्याय त्यांच्या बाबतीत दिला तोच राहुल गांधींच्या बाबतीत झाला पाहिजे. गुन्हा करणारी व्यक्ती लहान आहे की मोठी याकडे कायदा पाहत नाही. सावरकर हे निश्चितच शरद पवारांपेक्षा मोठे आहेत”.
“सावकरांना भारतरत्न देण्याची मागणी करण्याचा संजय राऊतांना काय अधिकार आहे. तुमचे सहकारी पक्ष रोज सावरकरांना शिव्या देत आहेत. त्यांनी जेव्हा अश्लील लेख लिहिला होता, तेव्हा मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी गेलो होतो. मला भेट नाकारण्यात आली. जे पत्र दिलं त्याचं उत्तर देण्याचंही सौजन्य नाही. तुमच्या सहकारी पक्षांना साधं तुम्ही सांगू शकत नाही. सत्तेच्या मोहासाठी तुम्ही बदनामी खपवून घेता. आमच्या कुटुंबाने भारतरत्न देण्याची कोणतीही मागणी केलेली नाही आणि करणारही नाही,” असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.