महापौरपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे निरीक्षक शरद रणपिसे उद्या (शनिवार) नगरला येणार आहेत. मात्र ते येथे येऊन करणार काय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. पक्षाचे सर्वच नगरसेवक उमेदवारांबरोबर सहलीला रवाना झाले असून, रणपिसे हे उद्या कोणाशी चर्चा करणार आणि काय निर्णय घेणार, याबाबत सगळाच अंधार असल्याने त्यांचा हा दौरा फार्स ठरण्याचीच चिन्हे आहेत.
महापौरपदाची निवडणूक दि. ८ ला (सोमवार) होणार आहे. ही निवडणूक ४८ तासांवर आली आहे. केवळ काँग्रेसच नव्हेतर सर्वच राजकीय पक्षांचे नगरसेवक सत्ताधारी किंवा विरोधी असा कोणत्या तरी उमेदवारांच्या सहलीवर रवाना झाले आहेत. एव्हाना त्यांचे निर्णयही स्थानिक पातळीवर झाले असून या टप्प्यात रणपिसे नगरला येऊन काय करणार हा प्रश्नच आहे.
महानगरपालिकेत काँग्रेसचे ११ नगरसेवक असून त्यांची राष्ट्रवादीशी युती आहे. महापौरपद राष्ट्रवादीला आणि उपमहापौरपद काँग्रेसला अशी वाटणी त्यांच्यामध्ये झाली आहे. महापौरपदासाठी राष्ट्रवादीने अभिषेक कळमकर यांना व शिवसेनेने सचिन जाधव यांना उमेदवारी दिली आहे. या दोघांनी आपापल्या परीने नगरसेवकांची जुळवाजुळव करीत त्यांना अज्ञातस्थळी सहलीवर रवाना केले आहे. ही निवडणूकही आता ४८ तासांवर येऊन ठेपली असून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण वगळता पक्षाचे अन्य सर्वच नगरसेवक या सहलीवर रवाना झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर शनिवारी रणपिसे नगरला येऊन पक्षाच्या भूमिकेबद्दल कोणाशी चर्चा करणार, हा प्रश्नच आहे. त्यांचा हा दौरा निश्चित करताना महपौरपदाच्या निवडणुकीबाबत नगरसेवकांशी चर्चा करून पक्षाची भूमिका ठरवण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
महापौरपदाची निवडणूक जाहीर होऊन आता दहा दिवस होऊन गेले. खरेतर, जगताप यांनी राजीनामा दिला, त्याच वेळी ही निवडणूक होणार हे निश्चित होते. त्या वेळी काँग्रेसला पक्षाच्या भूमिकेबाबत चर्चा करण्याची गरज वाटली नाही. मात्र सर्वच नगरसेवक गायब झाल्यावर शनिवारी कसली चर्चा करणार आणि काय निर्णय घेणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. पक्षाचा एक नगरसवेक शिवसेनेच्या गळाला लागला असून उर्वरित आठ नगरसेवक राष्ट्रवादीच्या सहलीत सहभागी आहेत. त्यांची सूत्रे गटनेता म्हणून संदीप कोतकर हेच हलवत आहेत. पक्षाचा व्हीप काढण्याचा अधिकारही त्यांनाच आहे. या पाश्र्वभूमीवर रणपिसे यांच्या शनिवारच्या दौऱ्याचे गांभीर्य तो होण्याआधीच संपुष्टात आले आहे. शिवाय येथे येऊन ते शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णयही घेऊ शकत नाही, म्हणजेच राष्ट्रवादीबरोबरच त्यांना जावे लागेल, हेही स्पष्ट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा