Ranveer Allahbadia-Samay Raina: गेल्या दोन महिन्यांपासून वादात सापडलेला ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ शोचा सूत्रधार समय रैना आणि या शोमध्ये पाहुणा म्हणून आलेला यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सायबर सेलनं या कार्यक्रमाशी संबंधित व्यक्तींची चौकशी केल्यानंतर यासंदर्भातली सविस्तर माहिती दिली आहे. त्यात समय रैना व रणवीर अलाहाबादिया हे अश्लीलता पसरवल्याप्रकरणी दोषी आढळून आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या प्रकरणात लवकरच आरोपपत्र दाखल करणार असल्याचं सायबर सेलनं सांगितलं आहे.

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भातली सविस्तर माहिती दिली आहे. मंगळवारी सायबर सेलनं इंडियाज गॉट लॅटेंट शोमधील समय रैना, रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा मखिजा, आशिश चंचलानी व जसप्रीत सिंग यांची चौकशी केली. याआधी त्यांच्यापैकी प्रत्येकाला स्वतंत्रपणे बोलवून त्यांची चौकशी करण्यात आली होती. गेल्या शुक्रवारी सायबर सेलचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव यांनी लवकरच या प्रकरणात आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे.

अश्लीलतेसंदर्भात जागतिक नियम नाहीत, पण…

दरम्यान, महाराष्ट्र सायबर सेलकडून आयोजित एका कार्यक्रमात बोलताना यशस्वी यादव यांनी अश्लीलतेच्या व्याख्येसंदर्भात भाष्य केलं. “अश्लीलतेसंदर्भात कोणतीही जागतिक पातळीवर सर्वमान्य व्याख्या नाही. त्या त्या विशिष्ट संस्कृती वा संदर्भावर अश्लीलता अवलंबून असते. भारतात आपण आपल्या पालकांचा खूप आदर करतो. जर कुणी त्यांच्याबद्दल अश्लील विधानं केली, तर इथे ते प्रकरण अश्लीलतेचं ठरतं”, असं यादव म्हणाले.

अश्लीलतेबाबत सर्वोच्च न्यायालयाची व्याख्या..

दरम्यान, यशस्वी यादव यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये उल्लेखित केलेल्या व्याख्येचाही संदर्भ यावेळी दिला. “लोकांच्या वासना व कामुकतेला आकर्षित करणाऱ्या गोष्टी अश्लील ठरतात, असा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. या व्याख्येनुसार, इंडियाज गॉट लॅटेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर अश्लीलतेचा वापर हा अधिक व्यूज, लाईक्स आणि पर्यायाने अधिक नफा कमावण्यासाठी केला जात असल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. या प्रकरणी आम्ही लवकरच आरोपपत्र दाखल करू”, असंदेखील यादव यांनी नमूद केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणावरून बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या शिवसेना पक्षावर एका गाण्याच्या माध्यमातून टीका-टिप्पणी केली. यासंदर्भात थेट सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. या प्रकरणात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर मोठी चर्चा पाहायला मिळाली. अशाच प्रकारे रणवीर अलाहाबादिया व समय रैना यांच्याही बाबतीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.