Raosaheb Danave Viral Video Update : भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओवरून रावसाहेब दानवे यांच्यावर टीकाही केली जातेय. अर्जुन खोतकर यांचा सन्मान करताना त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला लाथाडल्याचं या व्हिडिओतून स्पष्ट दिसतंय.
महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांची रावसाहेब दानवे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी दोन्ही नेत्यांचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उभे होते. अर्जुन खोतकरांना शुभेच्छा देण्याकरता रावसाहेब दानवे यांनी त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ दिला. त्यानंतर एकत्र फोटो काढण्याकरता दोघेही उभे राहिले. मात्र, तेवढ्यात रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या बाजूलाच उभा असलेल्या कार्यकर्त्याला लाथ मारली. फोटो फ्रेममध्ये येणाऱ्या कार्यकर्त्याला लाथ मारल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. तर, त्याने काहीतरी मिश्किल टिप्पणी केल्याने त्याला लाथाडल्याचंही काहीजण म्हणत आहेत.
रावसाहेब दानवे हा माज बरा नव्हे..फोटो काढताय तो पण तुम्ही एका गद्दारासोबतच हे लक्षात ठेवा…
सामान्य जनतेला अशी लाथ मारणे चांगले नाही
लोकसभेचा माज अजून उतरलेला दिसत नाही..
?? pic.twitter.com/A1KvGzl0t1— सिद्धेश पाटील (@Sagarpa31447100) November 11, 2024
या घटनेवरून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. शरद पवार म्हणाले, “त्या पक्षामध्ये सहकाऱ्यांना कसं वागवलं जातं, याचं ते उदाहारण आहे.” तर या मुद्द्यावरून संजय राऊतांनीही संपप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “ही तुमच्या पक्षाची संस्कृती आहे का? तुम्ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना याबाबत विचारा. रावसाहेब दानवे यांच्याविषयी किती वेळा आम्ही बोलायचं? कार्यकर्त्यांना अशा लाथा घालताना गारगार वाटतंय का? असंही देवेंद्र फडणवीसांना विचारा. “प्रत्येकाने सत्ताधारी आणि विरोधकांनी सर्वांचा आदर केला पाहिजे. वाचाळवीरांनी वाचाळपणा बंद करावा”, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी तीन-चार दिवसांतच घराबाहेर पडून जनसंपर्कास सुरुवात केली. त्यामध्ये प्रामुख्याने भोकरदन विधानसभा मतदारसंघातील भागांचा समावेश होता. या मतदारसंघातून त्यांचे पुत्र संतोष दानवे निवडणूक लढवत आहेत. मागील दोन्ही निवडणुकांत पराभूत झालेले चंद्रकांत दानवे पुन्हा नशीब अजमावीत आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी पक्षाकडून तीन वेळेस आमदार राहिलेले आहेत. रावसाहेब दानवे यांच्यासारख्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने उभे केलेले आव्हान चंद्रकांत दानवे यांच्यासमोर असले, तरी या वेळेस त्यांना काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे यांची साथ लाभणार आहे. त्यामुळे हा मतदारसंघ हायवोल्टेज मतदारसंघ ठरला आहे.
© IE Online Media Services (P) Ltd