निवडणुका लागल्या की महाविकास आघाडीतील आमदार भाजपामध्ये येतील, असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, परंतु ते सावरले आणि बहिष्कार टाकला नाही. जशा निवडणुका लागतील, तसे ते सर्वजण भाजपात येतील आणि ते आमच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य दानवे यांनी केलंय. ते एबीपी माझाशी बोलत होते.
“शरद पवारांनी त्यांच्या तरुण आमदारांना…”, पवारांच्या ‘त्या’ विधानावर चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला!
यावेळी बोलताना रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, “ज्या दिवशी शिवसेनेनं आम्हाला सोडलं आणि त्यांच्यात जाऊन मिळाले तेव्हाच त्यांचा भगवा रंग संपुष्टात आला. आता त्यांनी हिरवं पांघरून घेतलंय आणि ते हिरव्याचं समर्थन करतात. फक्त उरलेली इज्जत वाचवण्यासाठी सध्या ते भगवा-भगवा करत असतात. त्यामुळे भेसळ आमच्यात आहे की त्यांच्यात हे त्यांनी तपासून पाहावं. भेसळ एकट्याची होत नसते, तर दोन-तीन एकत्र आले की ती भेसळ होत असते,” अशी खरपूस टीका दानवेंनी केली.
“आम्ही कधीच कोणाच्या पाठीत वार केला नाही. यांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी युती तोडली. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता राहिली नाही, ही शिवसेना उद्धव ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांची झाली आहे,” असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला सुनावलं.