राज्यसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आपली मतं फुटू नयेत म्हणून महाविकास आघाडी सरकार आज मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहे. त्यांना एका हॉटेलमधून दुसऱ्या हॉटेलमध्ये हलवलं आहे. यावरून भारतीय जनता पार्टीचे नेते रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांची अवस्था माजरांच्या पिल्लांसारखी झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
भाजपाने उभा केलेला तिसरा उमेदवार नक्की निवडून येणार आहे, याबाबत आमच्या मनात कसलीही शंका नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. राज्यसभा निवडणूक जिंकण्यासाठी महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू असल्याबाबत विचारलं असता दानवे म्हणाले की, “मागील दोन तीन दिवसांत समोर आलेल्या बातम्यांचा विचार केला तर त्यांच्या बैठकीला सर्व अपक्ष आमदार उपस्थित नव्हते. अपक्षांच्या पाठिंब्याने जर हे सरकारमध्ये येत असतील तर त्यांच्या मनात एवढा अविश्वास का आहे? असा सवालही दानवे यांनी यावेळी विचारला आहे.
अपक्षाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केल्यानंतर आता त्यांना हॉटेलमध्ये बंदिस्त करण्यात आलं आहे. प्रत्येकाला लोकशाहीचा अधिकार आहे. त्यांना मतदान करण्याचं स्वातंत्र्य असायला हवं, असंही ते म्हणाले. महाविकास आघाडीला भाजपाची भीती नाही, तर अपक्ष आमदार कधीही सोडून जातील, याची भीती सर्वाधिक आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये बंदिस्त करून ठेवलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांची अवस्था माजरांच्या पिल्लांसारखी झाली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.