भाजपने सहावा उमेदवार उतरविल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी आज येथे नाकारली. मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते यांनी अपक्ष म्हणून भरलेल्या सातव्या उमेदवारीचा उल्लेख करून राजकारण अनेकदा अनपेक्षित घडण्याची शक्यता नाकारता येत नसते, अशी पुस्ती त्यांनी जोडली. मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर विरोधकांकडून होणारे आरोप तथ्यहीन असून त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.
मुंबई महापालिका निवडणुकीस आणखी वेळ असल्याने तेथील भाजप-शिवसेना युतीसंदर्भात आताच बोलता येणार नाही. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत युती वा आघाडीच्या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाने यापूर्वी अनेक ठिकाणी त्या-त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे मुंबई प्रदेश भाजपचे पदाधिकारी युतीसंदर्भात निर्णय घेतील. शिवसेनेऐवजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करून मुंबई महापालिकेची निवडणूक लढविण्यासंदर्भातील कोणतीही चर्चा प्रदेश पातळीवर पक्षात झाली नाही, असेही ते म्हणाले.

‘खडसेंना वगळण्याचा प्रश्नच नाही’!
दाऊदचे फोन कॉल्स, तसेच नातेवाईकांच्या नावावर भोसरी येथील जमीन खरेदीप्रकरणी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर विरोधकांकडून होणारे आरोप तथ्यहीन असून त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगून दानवे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष पूर्णपणे खडसे यांच्या पाठिशी आहे. दाऊदशी खडसे यांचे बोलणे झाल्याचा आरोप पक्षाला मान्य नाही. जळगाव जिल्ह्य़ातील खासदार-आमदार आपणास पक्ष संघटनेसंदर्भात स्थानिक पातळीवरील नियुक्तया, संघटनात्मक कामांसाठी भेटले. त्याचा वेगळा अर्थ काढता कामा नये. यंत्रणेमध्ये हेराफेरी करून एखाद्याने केलेला कॉल दुसऱ्याच्या नावावर दाखवता येऊ शकतो, याचे प्रात्यक्षिक खुद्द खडसे यांच्या उपस्थितीतच दाखविण्यात आल्याचा संदर्भ दानवे यांनी या अनुषंगाने दिला.

Story img Loader