सर्वसामान्य जनतेचे प्रेम, भाजपवर कायम निष्ठा, पक्षश्रेष्ठींचा विश्वास व मित्रपक्ष शिवसेनेचे सहकार्य या बाबी ३५-४० वर्षांच्या राजकीय वाटचालीस आपणास नेहमीस साह्य़भूत ठरल्या. त्यामुळेच केंद्रातील मंत्रिपदापर्यंत मी पोहोचू शकलो. मंत्रिपदाची संधी ही याची पावतीच असल्याची भावना नवनिर्वाचित राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.
दानवे यांच्या रुपाने जालना जिल्ह्य़ास पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. मंत्रिपदाच्या निश्चितीनंतर ‘लोकसत्ता’शी बोलताना दानवे यांनी आपल्या साडेतीन दशकांच्या वाटचालीस उजाळा दिला. १९८०पूर्वी ग्रामपंचायत सदस्य होतो. परंतु माझ्याकडे पंचायत समितीचे सभापतिपद आले. १९८५ची विधानसभा निवडणूक आजही चांगली आठवते. त्यावेळी काँग्रेसकडून मी जवळपास दीड हजार मतांनी पराभूत झालो. परंतु त्यामुळे खचून काही गेलो नाही आणि नव्या जोमाने सर्वसामान्य जनतेशी संपर्क वाढविला. याचेच फळ १९९० व १९९५च्या निवडणुकांत मिळाले. काँग्रेसच्या दिग्गज पुढाऱ्यांविरोधात सामान्य मतदार माझ्या पाठीशी उभा राहिला. १९९६ व १९९८च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जालना मतदारसंघात भाजपने दिलेल्या उमेदवारावरून पक्षांतर्गत काही मंडळी विरोधात होती. पुढे ही मंडळीही पक्षात राहिली नाहीत. परंतु त्या वेळेसही आपण पक्षनिष्ठा प्रमाण मानून श्रेष्ठींनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून प्रचार केला. अविचल पक्षनिष्ठा ठेवल्यानेच मागील चार दशकांतील आपली वाटचाल विरोधकांना नामोहरम करीत यशस्वीपणे सुरू राहिली.
सहकार क्षेत्र ही काँग्रेसची मक्तेदारी आहे, असे मानण्याच्या काळात आपण या क्षेत्रात काम सुरू केले. सहकारी साखर कारखान्याची उभारणी करण्याचे अवघड काम जनतेच्या विश्वासामुळेच करू शकलो. साखर कारखान्याची उभारणी तर केलीच, परंतु यशस्वीपणे चालविलाही आणि सध्याही कारखाना सुरू आहे. जिल्हा बँक म्हटले की तेथे काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्राबल्य नेहमीच गृहीत धरले जात असे. परंतु आपण मित्रपक्ष शिवसेनेच्या मदतीने जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचलो, असा प्रवास दानवे यांनी या वेळी उलगडून दाखविला.
मी सामान्य घरातून आलेला. कुटुंबात कोणाचाही राजकारणाशी दुरान्वयानेही संबंध नव्हता. मग मी इथपर्यंत कसा पोहोचलो, या प्रश्नाचे उत्तर माझ्यावर सर्वसामान्य जनतेने टाकलेल्या विश्वासात मिळेल. सामान्य जनतेशी आपली नाळ कायम कशी जोडलेली राहील, हे पुढाऱ्यांना अवगत नसले, तर त्यांच्या राजकीय वाटचालीस अर्थ राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.