भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे नेहमीच त्यांच्या मिश्किल टिप्पणींसाठी चर्चेत असतात. यातून कधी ते वादातही सापडतात. मात्र, त्यांच्या वक्तव्याची मोठी चर्चा होते हे मात्र खरं. रावसाहेब दानवेंनी जालन्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना असंच एक विधान केलं आणि स्टेजवरील मान्यवरांसोबतच समोर बसलेल्या उपस्थितांमध्ये देखील हास्याची एकच लहर उठली. जालनामध्ये जनआशीर्वाद यात्रेदरम्यान रावसाहेब दानवे आणि भागवत कराड हे दोन्ही केंद्रीय मंत्री व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना रावसाहेब दानवे यांनी नव्या केंद्रीय मंत्र्यांचा शपथविधी सुरू होता, तेव्हा आपण शपथ का नाही घेतली, हे सांगितलं.
नेमकं झालं काय?
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर अनेक नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये भागवत कराड यांचा देखील समावेश होता. याचदरम्यान, रावसाहेब दानवे यांचं मंत्रिपद जाणार, अशी चर्चा सुरू होती. मात्र, ते कायम राहिलं. त्यावरून बरीच चर्चा सुरू होती. या मुद्द्यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, “दिल्लीत ७ तारखेला डॉक्टरांनी (भागवत कराड) शपथ घेतली. माझं शपथ घेण्याचं काम नव्हतं. कारण डॉक्टर साहेबांची मांडव परतणी चालू होती, माझा हनिमूनही झालाय. मी केंद्रीय मंत्रिमंडळात तिसऱ्य्ंदा मंत्री झालोय. त्यामुळे मला शपथ घेण्याची गरज पडली नाही”.
…म्हणून ४० वर्षांत निवडणूक हरलो नाही!
दरम्यान, यावेळी बोलताना रावसाहेब दानवे यांनी गेल्या ४० वर्षांत आपण निवडणूक का हरलो नाही, याचं गुपित सांगितलं. “नेते लोकांमधून निवडून आल्यानंतर बदलतात. पण मी नेहमीच लोकांमध्ये राहतो आणि त्यांच्यासारखाच वागतो. त्यामुळेच ४० वर्षात मी एकही निवडणूक हरलेलो नाही”, असं ते म्हणाले. “लोकांनी सातत्याने ३५ वर्ष निवडून दिलं नसतं, तर माझ्या गावातल्या मारोतीच्या पारावर हरिपाठ म्हणत बसलो असतो”, असं देखील दानवेंनी मिश्किलपणे म्हटलं.