Raosaheb Danve On Maharashtra Government Formation : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं. त्यानंतर महायुतीकडून सरकार स्थापनेच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात झाली. मात्र, विधानसभेचा निकाल लागल्यानंतर आज तब्बल ८ दिवस झाले तरीही महायुतीचं सरकार स्थापन होऊ शकलं नाही. सरकार स्थापनेसाठी मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. मुख्यमंत्रिपदी भाजपाच्या नेत्याची वर्णी लागणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार? याबाबत अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.
अशातच शिवसेना (शिंदे) पक्षप्रमुख तथा राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीकडे राज्याचं गृह व महसूलमंत्रिपद मागितल्याची चर्चा आहे. मात्र, यासाठी भारतीय जनता पक्षाने विरोध दर्शवल्यामुळे शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. यातच शिंदे साताऱ्यातील त्यांच्या दरेगावी आहेत. तसेच शिवसेनेच्या (शिंदे) नेत्यांकडून एकनाथ शिंदे नाराज नसल्याचं स्पष्टीकरण देखील देण्यात येत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून देखील विविध प्रतिक्रिया येत आहेत. आता भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील यावर भाष्य केलं. मात्र, याचवेळी त्यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा रंगली आहे. ‘ठाकरे सोबत असते तर आज मिळालेल्या बहुमतापेक्षा अधिक जास्त बहुमत मिळालं असतं’, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : गृह व महसूल मंत्रीपदावरून शिंदे नाराज? गुलाबराव पाटलांनी मांडली शिवसेनेची भूमिका; म्हणाले, “गैर काय?”
रावसाहेब दानवे काय म्हणाले?
“२०१९ साली आमच्या महायुतीला जवळपास १६५ ते १६७ जागा मिळाल्या होत्या. मात्र, तेव्हा शिवसेना संजय राऊतांच्या बोलण्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेली. जर शिवसेना (उद्धव ठाकरे) काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेली नसती तर असा कारभार केला असता जो पहिल्यांदा २०१४ ते २०१९ या कार्यकाळात झाला. त्या कारभाराच्या आधारावर आज जेवढं बहुमत मिळालं त्यापेक्षा जास्त बहुमत आम्हाला मिळालं असतं”, असं रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.