लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आमच्या सोबत राहावे ही आमची इच्छा आहे, असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी, दुष्काळाला प्राधान्य न देता राममंदिर प्रश्नाला प्राधान्य देण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेचा भाजपाला तोटा होणार नसल्याचेही स्पष्ट केले. ते येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आ. विनायक पाटील, खा. सुनील गायकवाड आदी उपस्थित होते.
दानवे म्हणाले, राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांत बूथनिहाय निवडणूक तयारी सुरू असून लातूरला आढावा बठकीसाठी आपण आलो आहोत. डिसेंबरमध्ये तालुकानिहाय बूथ कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले जाणार आहेत.
समविचारी पक्षासोबत निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. राममंदिराचा मुद्दा नवा नाही, शिवसेनेने त्यांच्या प्राधान्यक्रमाने हा मुद्दा घेतला आहे. त्याला भाजपाची हरकत नसल्याचे ते म्हणाले.
काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र आले तरी निवडणुकीत भाजपाला पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळतील. केंद्रात व राज्यात पुन्हा भाजपाचीच सत्ता येईल, असा दावाही त्यांनी केला. विकास कामांच्या जोरावर आम्ही निवडून येऊ या भीतीने विरोधकांच्या पोटात गोळा येत असून ते जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही दानवे यांनी केली.