लक्ष्मण राऊत
जालना : शिवसेना-भाजप युती असताना जालना लोकसभेची जागा कायम भाजपकडेच राहात आलेली असून १९९६ पासूनच्या सात निवडणुका या पक्षाने सलग जिंकलेल्या आहेत. त्यापैकी १९९६ आणि १९९८ मध्ये उत्तमसिंह पवार भाजपकडून निवडून आले होते. तर १९९९ पासूनच्या सलग पाच निवडणुका रावसाहेब दानवे यांनी जिंकलेल्या आहेत. तसे पाहिले तर १९८९ पासून झालेल्या नऊ निवडणुकांत १९९१ मधील त्यावेळचे काँग्रेसमधील उमेदवार कै. अंकुशराव टोपे यांचा अपवाद वगळता आठ वेळेस भाजप उमेदवारांचा विजय जालना लोकसभा मतदारसंघातून झालेला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीतही रावसाहेब दानवे हेच उमेदवार असतील हे स्पष्टच असून त्यांनी स्वत:च जालना येथील रेल्वेच्या एका कार्यक्रमात यापूर्वी पुढील खासदार आपणच असू असे सांगून टाकलेले आहे. जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या या लोकसभा मतदारसंघावरील आपला प्रभाव दानवे यांनी यापूर्वी पाच वेळेस सिद्ध करून दाखविलेला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत हा लोकसभा मतदारसंघ नेहमीच काँग्रेसकडे राहिलेला आहे. अपवाद फक्त १९९९ मधील निवडणुकीचा. कारण त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाली नव्हती आणि दोन्ही पक्षांनी स्वतंत्ररीत्या उमेदवार उभे केले होते. परंतु दानवे तीन लाख ३२ हजारांपेक्षा अधिक मते घेऊन निवडून आले. दोन वेळेस भोकरदनमधून विधानसभा सदस्य म्हणून निवडून येणाऱ्या दानवेंची ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती आणि त्यांच्यासमोर काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्वतंत्र उमेदवार होते. गेल्या नऊपैकी आठ निवडणुकांत आणि त्यापैकी सलग सात निवडणुकांत भाजपसमोर पराभूत झालेला काँग्रेस पक्ष आगामी निवडणुकीत भाजपला आव्हान देऊ शकेल का, हा खरा प्रश्न आहे. २००९ मध्ये दानवे निवडून आले होते. परंतु त्यांना काँग्रेसचे कल्याण काळे यांच्याशी कडवी झुंज द्यावी लागली होती. या निवडणुकीत दानवे आणि काळे यांच्या मतांमधील अंतर साडेआठ हजारांच्या आसपास होते. त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या दोन्ही निवडणुका दानवे यांनी काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांच्या विरुद्ध मोठय़ा फरकाने जिंकल्या. बदलत्या राजकीय वातावरणात दानवे यांचा या लोकसभा मतदारसंघावरील प्रभाव अधिक वाढला आहे. भाजपबरोबर असणाऱ्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे आमदार असलेले पैठण आणि सिल्लोड हे दोन विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात आहेत. याशिवाय जालना वगळता या लोकसभा मतदारसंघातील अन्य तीन विधानसभा मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. जालना विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार राहिलेले अर्जुन खोतकर आता ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात असल्याने पर्यायाने भाजपसोबत आहेत. ते आणि दानवे आता एकत्र आहेत. मागील सात-आठ वर्षांत रावसाहेब दानवे यांचे भाजपमधील आणि जालना जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्व वाढले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि दोन वेळेस केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे विरोधी पक्षांतील लहान-मोठे पुढारी आणि कार्यकर्त्यांमध्ये दानवेंबद्दलचे आकर्षण वाढलेले आहे. दोन वेळेस आमदार राहिलेले विलास खरात यापूर्वीच भाजपमध्ये गेलेले आहेत आणि अलीकडेच जालना जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष भीमराव डोंगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विकासकामांचा मुद्दा पुढे करून त्या संदर्भातील तपशील आणि मिळालेला निधी याची माहिती देऊन दानवे विविध व्यासपीठांवरून आपले तसेच भाजपचे महत्त्व अधोरेखित करीत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्यासमोर कोण उमेदवार असेल किंवा त्यासाठी आतापासून कोणते प्रयत्न सुरू आहेत याबाबत काँग्रेस पक्षात सामसूम असल्याचेच सध्यातरी दिसत आहे. प्रदेश काँग्रेसकडून आलेले कार्यक्रम जिल्ह्यात होतात, परंतु आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्याची जिद्द मात्र त्यामधून जाणवत नसल्याचेच चित्र आहे.