माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपाचे खासदार रावसाहेब दानवे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. खासदारकी लढवण्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये अनेकवेळा राजकीय वाद झालेले आहेत. खोतकर नुकतेच शिंदे गटात सामील झाले आहेत. यानंतर शिंदे गट आणि भाजपा युती यांच्यामार्फत जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी कोणाला संंधी मिळणार. असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. शिंदे गट-भाजपाची युती झाली तर खोतकर यांच्यासाठी दानवे आपला मतदारसंघ सोडणार का असेदेखील विचारले जात आहे. असे असताना दाववे यांनी या प्रश्नावर थेट उत्तर दिले आहे. खासदारकी सोडण्याचा मला अधिकार नाही. ही खासदारकी भाजपाची आहे. अर्जुन खोतकर आणि माझ्यातील भांडण मिटलेले आहे, असे दानवे म्हणाले. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
हेही वाचा >>> नवाब मलिकांनी केलेल्या ‘त्या’ आरोपाप्रकरणी समीर वानखेडेंना क्लीनचिट; जन्माने मुस्लीम नसल्याचा निष्कर्ष
“अर्जुन खोतकर हे माझे मित्र आहेत. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो. आम्ही दोघे एकत्र बसलो. आमचे भांडण मिटले. खासदारकी रावसाहेब दानवेच्या बापाची आहे का? उद्या मी खासदारकी सोडली तरी पक्षा सोडणार नाही. मला म्हणतील तू घरी जा आम्ही दुसरा आणतो. खासदारकी सोडणे माझ्या हातात नाही. ही खासदारकी भाजपाची आहे. मागील २५ वर्षांपासून मी या मतदारसंघातून जिंकत आलो आहे. भाजपाने एकूण ९ वेळा ही जागा जिंकलेली आहे. ही जागा सोडण्याचा अधिकार मला नाही,” असे थेट भाष्य रावसाहेब दानवे यांनी केले.
हेही वाचा >>> मुंबईनंतर आता औरंगाबादेतही शिंदे गटाकडून उभारले जाणार कार्यालय, जागेचा शोध सुरू!
शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार आणि शिंदे गटातील नाराजी यावरदेखील दानवे यांनी भाष्य केले आहे. “सध्या कोणीही नाराज नाही. हे सरकार अडीच वर्षे टीकणार आहे. आम्ही सर्वांनाच सोबत घेणार आहोत. येणाऱ्या विधानसभा, लोकसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच भाजपा एकत्र लढणार आहे. आगामी काळात आम्ही विधानसभेच्या २०० जागा जिंकू,” असा विश्वास दानवे त्यांनी व्यक्त केला.