‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपला माकड संबोधल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ‘माकडाकडून दुसरी काय अपेक्षा करणार’ अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ओवेसींसारखी माणसे अदखलपात्र आहेत, अशी टीकाही त्यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केली.
भाजप सदस्यता मोहिमेचा आढावा घेण्याकरिता दानवे गुरुवारी नागपुरात आले होते. ओवेसी यांनी भाजपचा माकड म्हणून उल्लेख करणे व नागपुरात जाहीर सभा घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आव्हान देण्याचे वक्तव्य करणे याबाबत त्यांनी ओवेसींवर टीकास्त्र सोडले. ‘ओवेसींसारख्यांकडून अशा वागण्याव्यतिरिक्त दुसरी अपेक्षाच करता येणार नाही. संघाला सरकारसह आजवर अनेकांनी आव्हाने दिली आणि अशा प्रत्येक वेळी संघ आणखी मजबूत होऊन वर आला आहे. त्यामुळे ओवेसींसारख्या एखाद्या माणसाची संघाला दखल घेण्याची गरज नाही. त्यांच्या वक्तव्यांबाबत सरकारला काही आक्षेपार्ह वाटले तर सरकार त्यांच्यावर कारवाई करेल,’ असे दानवे म्हणाले.
पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे सुतोवाचही त्यांनी केले. भाजपमध्ये एक व्यक्ती-एक पद हीच पद्धत असल्याने आपण केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा आठवडाभरात देणार आहोत, असे त्यांनी सांगितले. एकीकडे भाजप-सेनेत समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगतानाच, ज्या पक्षात जास्त बळ असेल तो पुढे जाईल, असेही मत दानवे यांनी व्यक्त केले. शिवसेनेकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या घोषणा वारंवार केल्या गेल्या. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, दोन्ही पक्षांना स्वत:चा विस्तार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. दरम्यान नागपुरात आल्यानंतर त्यांनी रेशीमबागेतील स्मृतिमंदिर तसेच दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. हेडगेवार व डॉ.आंबेडकर यांना अभिवादन केले. मात्र संघ नेत्यांची व दानवेंची कुठलीही चर्चा झाली नसल्याचे भाजपतर्फे सांगण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा