‘शिवसेना’ पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरेंनी सोमवारी ( २० फेब्रुवारी ) भाजपावर जोरदार हल्ला चढवला. शिवसेनेसारखी परिस्थिती देशातील कोणत्याही पक्षावर लादू शकतात. आताच याचा मुकाबल नाही केल तर २०२४ ची निवडणूक शेवटची ठरेल. तसेच, निवडणूक आयोगाचा निर्णय अमान्य असून, तो देणारा आयोग बरखास्त करावा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पलटवार केला आहे.
“उद्धव ठाकरे काय बोलतात आणि त्यांच्या बोलवता धनी कोन आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हा देश लोकशाहीला मानणारा आहे. जो राजकीय पक्ष लोकशाहीला सोडून काम करण्याचा प्रयत्न करेल, त्याला जनता त्याची जागा दाखवून देईल. मग, २०२४ ची निवडणूक शेवटची कशी ठरेल,” असा सवाल रावसाहेब दानवेंनी उपस्थित केला आहे. ते चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“कार्यकर्त्यांना कर्मचाऱ्यासारखं वागवून…”
“देशात हुकूमशाही येणार का? लोकशाहीप्रमाणे यांनी पक्षाच्या निवडणुका घेतल्या नाहीत. हे लोकांना काय लोकशाही सांगत आहेत. खरे हुकूमशाह हे आहेत. कार्यकर्त्यांना कर्मचाऱ्यासारखं वागवून घेतात. आमच्याकडे कर्मचाऱ्यांना स्वातंत्र आहे. यांचं बोलणं हे नैराश्यातून आहे,” असा टोला रावसाहेब दानवेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
“आमचं असलेलं उद्धव ठाकरेंनी मोडलं, मग…”
निवडणूक आयोग बरखास्त करण्याच्या मागणी उद्धव ठाकरेंनी केली, याबाबत विचारलं असता रावसाहेब दानवे म्हणाले की, “निवडणूक आयोग बरखास्त करुन तिथे संजय राऊतांना बसवायाचं का? मोडतोड उद्धव ठाकरेंनी केली आहे. आमचं असलेलं उद्धव ठाकरेंनी मोडलं. मग, आम्ही त्यांचं मोडलं, तर फरक काय पडला,” असेही रावसाहेब दानवेंनी म्हटलं.