Raosaheb Danve Viral Video: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर यांच्यासह फोटो काढत असताना एका कार्यकर्त्याला लाथ मारली. एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. जालन्याचे शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर हे दानवेंना भेटायला आले होते. रावसाहेब दानवे अर्जुन खोतकर यांच्याबरोबर फोटो काढत असताना कार्यकर्ते देखील जवळ होते. त्यावेळी रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारून बाजूला सारले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हायरल व्हिडीओनंतर खोतकर यांच्यावर चहुबाजूंनी टीका झाली. यानंतर आता सदर कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दानवेंचा अडकलेला शर्ट काढत होतो

ज्या कार्यकर्त्याला लाथ बसली त्याचे नाव शेख अहमद असल्याचे समजते. शेख अहमद यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मी दानवे साहेबांचा जवळचा मित्र आहे. आमची मैत्री जवळपास तीस वर्षांपासूनची आहे. आज सकाळी व्हायरल झालेल्या बातमीत काहीही तथ्य नाही. लोक चिंधीचाही साप बनवतात. खोतकर दानवेंना भेटायला आले होते. त्यावेळी दानवेंचे शर्ट अडकले होते. ते काढण्यासाठी मी पुढे गेलो होतो. तेव्हा त्यांच्या हातामध्ये पुष्पगुच्छ असल्यामुळे त्यांनी तसे केले. मात्र त्या व्हिडीओमध्ये दिसते तसे काही नाही.

हे वाचा >> Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: आजही उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी, व्हिडीओ काढत म्हणाले…

या घटनेवरून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. शरद पवार म्हणाले, “त्या पक्षामध्ये सहकाऱ्यांना कसे वागवले जाते, याचे ते उदाहारण आहे.” तर या मुद्द्यावरून संजय राऊतांनीही संपप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “ही तुमच्या पक्षाची संस्कृती आहे का? तुम्ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना याबाबत विचारा. रावसाहेब दानवे यांच्याविषयी किती वेळा आम्ही बोलायचं? कार्यकर्त्यांना अशा लाथा घालताना गारगार वाटतंय का? असेही देवेंद्र फडणवीसांना विचारा. “प्रत्येकाने सत्ताधारी आणि विरोधकांनी सर्वांचा आदर केला पाहिजे. वाचाळवीरांनी वाचाळपणा बंद करावा”, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी तीन-चार दिवसांतच घराबाहेर पडून जनसंपर्कास सुरुवात केली. त्यामध्ये प्रामुख्याने भोकरदन विधानसभा मतदारसंघातील भागांचा समावेश होता. या मतदारसंघातून त्यांचे पुत्र संतोष दानवे निवडणूक लढवत आहेत. मागील दोन्ही निवडणुकांत पराभूत झालेले चंद्रकांत दानवे पुन्हा नशीब अजमावीत आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी पक्षाकडून तीन वेळेस आमदार राहिलेले आहेत. रावसाहेब दानवे यांच्यासारख्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने उभे केलेले आव्हान चंद्रकांत दानवे यांच्यासमोर असले, तरी या वेळेस त्यांना काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे यांची साथ लाभणार आहे. त्यामुळे हा मतदारसंघ हायवोल्टेज मतदारसंघ ठरला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raosaheb danve viral video kicks party worker now activist give explanation kvg