भाजपाचे केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांमध्ये केलेल्या टीकेवरून आता नवा राजकीय वाद निर्माण झाल्याचे दिसत आहे. रावसाहेब दानवेंच्या या विधानानंतर आता भाजपा व काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, दोन्ही पक्षांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसत आहे. “रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वापरलेली भाषा त्यांचा कुसंस्कृतपणा दाखवतो.” अशा शब्दांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीक केल्यानंतर, त्याला भाजपाकडून प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. “काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आडाणी भाषेत भाजपा नेत्यांवर टीका करतात, ते जमतं मग मंत्री रावसाहेब दानवेंनी केलेली टीका केली तर मिरच्या झोंबल्या का?” असा सवाल भाजप प्रवक्ते राम कुलकर्णीं यांनी केला आहे.
“काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे नेहमीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासुन राज्यातील भाजपा नेत्यांवर एकेरी शब्द आगपाखड करतात. अडाणी भाषेची त्यांची संस्कृती आहे. मग केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधींवर टीका केली तर कॉंग्रेसवाल्यांच्या नाकाला मिरच्या का झोंबल्या?” असा सवाल भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला. तसेच, आपला तो बंड्या अन् दुसऱ्याचं कारटं ही संस्कृती काँग्रेसवाल्यांची असल्याचेही त्यांनी म्हटले.
… मग राहुल गांधी यांना वळू म्हटलं तर नाकाला का झोंबलं? –
तसेच, “केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी जनआशिर्वाद यात्रेदरम्यान बदनापुर येथे बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना वळू ह्या शब्दाचा वापर केला होता. या बोलण्याचा निषेध काँग्रेस पदाधिकारी करत असले तरी राजकारणात आत्मपरिक्षण करणं महत्वाचं असतं. एकीकडे गेल्या अनेक दिवसांपासुन काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एकेरी शब्दात टीका करतात. पंतप्रधान पदाचं भान त्यांना रहात नाही. एवढच नव्हे तर अनेकदा राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरही अगदी असभ्य भाषेत टीका करतात. वेगवेगळ्या प्रश्नावर टीका करताना राजकीय पदाचं गरिमा पटोले हे कधीच ठेवताना दिसत नाहीत. त्यांनी केलेली टीका आणि शब्द खरं पाहता अशोभनीय असतात. मग आमचे नेते रावसाहेब दानवे यांनी राजकिय भाषणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वळू म्हटलं तर नाकाला का झोंबलं?” असंही राम कुलकर्णी यांनी सांगितलं आहे.
आपला तो बंड्या आणि दुसऱ्याचं कारटं ही काँग्रेसची संस्कृती –
“आपला तो बंड्या आणि दुसऱ्याचं कार्ट ही राजकीय असभ्यता काँग्रेसवाल्यांची असुन, अगोदर त्यांनी आपलं नेतृत्व काय बोलतं?याचं आत्मपरिक्षण करावं. रावसाहेब दानवे ४० वर्षांपासून राजकारणात आहेत. अस्सल ग्रामीण राजकीय नेतृत्व असुन राजकीय आरोप-प्रत्यारोप त्यांना काँग्रेसवाल्यांनी शिकवण्याची गरज नाही. भाषेची सभ्यता आणि राजकारणातील पदाची गरिमा याचे धडे खरं तर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनाच जालना जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिले तर योग्य होईल.” असंही राम कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
जनआशिर्वाद यात्रेच्या नावाखाली विरोधी पक्षांना फक्त शिव्या – पटोले
रावसाहेब दानवेंनी राहुल गांधीवर टीका केल्यानंतर काँग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला होता. “मोदी सरकारमधील राज्यातील मंत्री जनआशिर्वाद यात्रेच्या नावाखाली विरोधी पक्षांना फक्त शिव्या देण्याचे काम करत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर येऊन टीका करणे हाच भारतीय जनता पक्षाचा एकमेव कार्यक्रम आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वापरलेली भाषा त्यांचा कुसंस्कृतपणा दाखवतो. असे प्रत्युत्तर देत मोदी सरकारने ७ वर्षात महागाई, बेरोज़गारी, ग़रिबी, जीडीपी, अर्थव्यवस्थेवर काय दिवे लावले ते जनतेला सांगा?” असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला आहे.
चीनचे नाव घ्यायलाही मोदींना भीती वाटते –
यासंदर्भात बोलताना पटोले पुढे म्हणाले की, “जनतेला खोटी आश्वासने देऊन मोदी सरकार २०१४ साली सत्तेत आले. मागील सात वर्षात मोदी सरकारने देश रसातळाला घालवला. अर्थव्यवस्थेची ऐतिहासिक घसरण झाली आहे. जीडीपी घसरला आहे, पेट्रोल १०० रुपये पार करुन दोनशे रुपयाकडे वाटचाल करत आहे, डिझेल ९६ रुपये लिटर झाले आणि काँग्रेसच्या राजवटीत ४४० रुपयांना मिळणारा स्वयंपाकाचा गॅस ८५० रुपये झाला. महागाईमुळे जनतेचे जगणे कठीण झाले आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपामध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे.जागतिक पातळीवर भारताची पत घसरली आहे. चीन सीमाभागात अतिक्रमण करत आहे त्यावर मोदी सरकार चकार शब्द काढत नाही. चीनचे नाव घ्यायलाही मोदींना भीती वाटते.”
… म्हणून दानवेसारखे मंत्री शिवराळ भाषेतून टीका करत आहेत –
तसेच, “शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतमालाला दीडपट हमीभाव देणार अशा वल्गणा केल्या परंतु शेतकऱ्यांचे अच्छे दिन येण्याऐवजी मोदी सरकारने शेती व शेतकरी उद्ध्वस्त करणारे काळे कायदे आणले. शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यावर जीएसटी लावला जातो. खते, बियाणांच्या किमती भरमसाठ वाढवल्या असून शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचे काम मोदी सरकार करत असून ‘हम दो हमारे दो’चे हे सरकार व त्यांचे मंत्री जनतेची दिशाभूल करत आहेत. देशातील प्रश्न गंभीर असून सामान्य जनतेचे लक्ष या मुळ मुदद्यावरून दुसरीकडे वळवण्यासाठी दानवेसारखे मंत्री शिवराळ भाषेतून टीका करत आहेत. जनता त्यांच्या या भुलथापांना आता बळी पडणार नाही.” असंही पटोले यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस नेते मात्र भाजपावर टीका करताना पातळी सोडणार नाहीत –
याचबरोबर,“काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी, खासदार राहुलजी गांधी तसेच गांधी कुटुंबावर पातळी सोडून टीका करून रावसाहेब दानवे व भाजपाचे नेते त्यांची पातळी दाखवून देतात. त्यांच्यावर झालेले संस्कार यातून दिसतात. त्यांनी त्यांची पातळी सोडली तरी काँग्रेस नेते मात्र भाजपावर टीका करताना पातळी सोडणार नाहीत. मोदी सरकारबद्दल जनतेमध्ये तीव्र असंतोष असून जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल.”, असेही पटोले यांनी सांगितले आहे.