श्रीरामपूर दूध जिल्हा मध्यवर्ती सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदी रावसाहेब म्हस्के विजयी झाले. उपाध्यक्षपदी भाऊसाहेब टेमक यांची बिनविरोध निवड झाली. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या गटाने ऐनवेळी गोरक्षनाथ गाडे यांना अध्यक्षपदासाठी रिंगणात उतरवल्याने शेतकरी विकास मंडळात फूट पडली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत म्हस्के ६ मतांनी विजयी झाले.
जिल्ह्य़ातील नेवासे, श्रीरामपूर, राहुरी, कोपरगाव आणि राहाता या पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या श्रीरामपूर दूध जिल्हा संघाचा कधीकाळी राज्याच्या राजकारणात मोठा बोलबाला होता. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, प्रसाद तनपुरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे आणि रावसाहेब म्हस्के यांची युती झाली होती. त्यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळ विरुद्ध माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि संघाचे मावळते अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखालील श्रीरामपूर दूध संघ बचाव मंडळात निवडणूक होऊन शेतकरी विकास मंडळास १५ तर विरोधी श्रीरामपूर दूध संघ बचाव मंडळास केवळ १ जागा मिळाली. रावसाहेब म्हस्के सर्वाधिक मते मिळवून विजयी झाले. त्याच वेळी अध्यक्षपदासाठी त्यांची वर्णी लागेल अशी चर्चा होती.
बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी सुनील खर्डे यांच्या उपस्थितीत पदाधिका-यांची निवडणूक झाली. अध्यक्षपदासाठी रावसाहेब म्हस्के आणि गोरक्षनाथ गाडे यांच्यात निवडणूक झाली. म्हस्के यांना ११ व गाडे यांना ५ मते मिळाली. उपाध्यक्षपदी नेवासे येथील भाऊसाहेब टेमक बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडीनंतर नव्या पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. श्रीरामपूर दूध जिल्हा संघात १४ वर्षांनंतर ज्येष्ठ नेते रावसाहेब म्हस्के यांना संधी मिळाल्याने सर्वच नेत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. दूध संघामध्ये पारदर्शकपणे काम करण्याबरोबरच संघाला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन म्हस्के यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा