वाहन चोरी, मंगळसूत्र चोरी, जबरी चोऱ्या करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात सातारा पोलिसांना यश आले असून यामध्ये विविध प्रकारची चार चाकी, दुचाकी वाहने, मोबाईल, रोख रक्कम असे एकंदर रु.५ लाख ६३ हजार ६८० चा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले, संजय साळुंखे हे सातारा येथील रहिवासी सध्या मणिपूर येथे मिल्ट्रीमधे जवान असून ते पुण्याहून साताऱ्याला पहाटे ५ च्या दरम्यान उतरले. एस.टी.स्टँडपासून पुढे गेल्यावर त्यांच्या जवळ एक मारुती मोटार थांबली व साळुंखे यांना हायवेला कसे जायचे असे विचारले व रस्ता दाखविण्याची विनंती केली व गाडीत घेतले. मात्र साळुंखे यांना वेगळा संशय येताच त्यांनी गाडी थांबवण्याची विनंती केली. पण गाडीतल्या ४ जणांनी अरेरावीची भाषा करीत त्यांच्याकडे पशाची मागणी केली, त्यांच्यात झटापट झाली. सुदैवाने चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन खड्डय़ात रुतुन बसली. त्याच संधीचा फायदा घेत साळुंखे यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे त्यातील तिघेजण पळून गेले. परंतु साळुंखे यांनी एकाला पकडून ठेवले व पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिसांनीही पूर्ण कार्यक्षमतेने तपास करून उरलेल्या तीनही जणांना पकडले व त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला. या टोळीमध्ये अकीब जावेद नंदगळकर उर्फ अकीब गुलाब बागवान (वय १९, निसर्ग अपार्टमेंट, करंजे, सातारा), हर्षद बागवान (वय २१, यादोगोपाळ पेठ, सातारा), असीफ पठाण (वय १९, शनिवार पेठ, सातारा), अतिक शेख (वय १९, बुधवार पेठ, सातारा) मोहसीन उर्फ गवशा वल्ली शेख (वय १९, आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) तसेच दोन अल्पवयीन मुले असून त्यांना रिमांड होममध्ये दाखल करण्यात आले आहे. सदर टोळीकडून जबर चोरीचे ५ गुन्हे, यामध्ये मंगळसूत्र, पर्स इ., वाहन चोरीचे १२ यामध्ये गुन्हे, ६ चार चाकी गाडय़ा, मारुती ८००, ६ दुचाकी गाडय़ा, १० मोबाईल हँडसेट, रोख रु.१०४४०/-, दोन ए टी एम कार्ड असा एकूण रु.५ लाख ६३ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अमोल तांबे, उपविभागीय कर्मचारी मनोज पाटील व सातारा ठाण्याचे निरीक्षक राजीव मुठाणे आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सावधगिरीच्या सूचना
रात्रीच्या वेळी कोणी अनोळखी माणसांनी पत्ता अथवा लिफ्ट देण्यासंदर्भात मागणी केली असता योग्य प्रकारे खात्री करून मगच द्या. शक्यतो रिक्षा अथवा बसेसचा वापर करा. संशय येताच नजीकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधा, असे आवाहन सातारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजीव मुठाणे यांनी केले.
जबरी चोऱ्या करणारी टोळी साताऱ्यात जेरबंद
वाहन चोरी, मंगळसूत्र चोरी, जबरी चोऱ्या करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात सातारा पोलिसांना यश आले असून यामध्ये विविध प्रकारची चार चाकी, दुचाकी वाहने, मोबाईल, रोख रक्कम असे एकंदर रु.५ लाख ६३ हजार ६८० चा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

First published on: 22-05-2014 at 02:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rapacious theft arrest in satara