नागपूर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या तरूणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कपीलनगर पोलीस उपनिरीक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. अक्षय ठाकरे (रा. वाशिम) असे आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हा पोलीस अधिकारी फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक अक्षय ठाकरे हा हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्याची गेल्या सहा महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामवरून कपीलनगरात राहणाऱ्या पीडीत २३ वर्षीय तरूणीशी ओळख झाली होती. ती एका कंपनीसाठी इव्हेंट मँनेजमेंटचे काम करते. भेट झाल्यानंतर दोघांचे सूत जुळले. यानंतर त्याने वर्दीचा धाक दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती दोन महिन्यांची गर्भवती झाली.
पीडितेने अक्षय ठाकूरला सांगितले असता त्याने तिला धमकी देऊन गर्भपात करण्यास सांगितले. मात्र, तरूणीने त्याला लग्नाची गळ घातली. त्याने नकार दिल्यामुळे पिडितेने कपीलनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक अक्षय ठाकरेवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी पळून गेला.