गडचिरोली / शिरूर : पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकातील घटना ताजी असतानाच राज्यात आणखी दोन बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. पहिली घटना गडचिरोली तालुक्यातील शिवणी गावातील असून पीडित तरुणी गंभीर जखमी आहे. तिच्यावर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

२ मार्चच्या रात्री शिवणी गावामध्ये शेतात बेशुद्धावस्थेत एक २३ वर्षीय तरुणी आढळली. तिच्या शरीरावर आणि गुप्तांगावर खोल जखमा असल्याने तिला ग्रामस्थांनी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला नागपूरला हलविण्यात आले असून वैद्याकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. ही तरुणी शौचासाठी गावालगत गेली होती. तासाभरानंतरही ती परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी शोध घेतला असता ती बेशुद्धावस्थेत आढळून आली. तिच्या हातावर, डोक्यावर, छातीवर आणि

गुप्तांगावर जखमा असून डोळ्याखाली दगडासारख्या तिक्ष्ण वस्तूने मारहाण केल्याचे व्रण आहेत. पीडितेवर उपचार सुरू असल्याने जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सोमवारी रात्रीपर्यंत पूर्ण झाली नव्हती. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून प्रकरणाचा लवकरच उलगडा होईल, असे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

दुसरीकडे शिरूरच्या कारेगाव येथे १९ वर्षीय तरुणीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अमोल पोटे (२५) आणि किशोर काळे (२९) या आरोपींना अटक केली असून त्यांना ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने सोमवारी दिले. पीडित युवती शनिवारी रात्री मामेभावाबरोबर गप्पा मारत असताना दोघांनी चाकूचा दाखवून दोघांना मारहाण करत तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तरुणीच्या भावाकडील सोन्याचे दागिनेही आरोपींनी पळविले. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले.

मुंबईत अल्पवयीन मुलीला पेटविले

मुंबई : मुलीच्या आईने भेटण्यास विरोध केल्याच्या रागातून एका ३० वर्षीय तरुणाने १७ वर्षीय मुलीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचा प्रकार येथील अंधेरीमध्ये घडला. यामध्ये मुलगी ६० टक्के भाजली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी गेल्या दीड वर्षापासून आरोपी जितेंद्र चंद्रकांत तांबे याला ओळखत असल्याचे तिच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. दोघांना भेटण्यास बंदी केल्याच्या रागातून जितेंद्रनेच आपल्याला पेटविल्याची माहिती दिली, असा दावा तिच्या आईने केला आहे. आरोपीही भाजला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

छेडछाडप्रकरणी आरोपींना कोठडीजळगाव

मुक्ताईनगर यात्रेतील छेडछाड- प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सातपैकी चार संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यातील तिघांना भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने ५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. चौथा आरोपी अल्पवयीन असून त्याला जळगावच्या बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात आले. संशयितांमध्ये शिवसेना (शिंदे) कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी मान्य केल्यानंतर पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी संशयित कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

Story img Loader