पालघर जिल्ह्यातील विरार येथे २ आरोपींनी स्वतःला दैवीशक्ती मिळाल्याचा दावा करत पैशांचा पाऊस पाडण्यासाठी विधी करायचं सांगून ४ महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकरणी अर्नाला कोस्टल पोलिसांनी एका २६ वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत २ आरोपींना अटक केलीय. मॅथ्यू पंडियान आणि दिनेश देवरुखकर अशी आरोपींची नावं आहेत.
आरोपींनी पीडित महिलांना त्यांच्याकडे दैवीशक्ती असल्याचा दावा केला. तसेच पैशांचा पाऊस पाडण्याचा विधी करायचा आहे. तो विधी केल्यास पैशांचा पाऊस पडेल आणि मग तुम्हाला २६० कोटी रुपये देऊ, असं आमिष दाखवलं. यानंतर पीडित महिलेने आणखी ३ महिलांशी संपर्क करून त्यांनाही या विधीसाठी तयार केलं. या विधीसाठी आरोपींनी या प्रत्येक महिलेकडून १०,००० रुपये पैसेही घेतले.
“विधी करण्याच्या नावाखाली ४ महिलांवर वारंवार बलात्कार”
यानंतर आरोपींनी या ४ महिलांवर विधी करायचे आहे या नावाखाली वारंवार बलात्कार केला. त्यानंतर या महिलांना दिलेल्या आश्वासना प्रमाणे त्यांना कोणतेही पैसे देण्यात आले नाही. हा संपूर्ण घटनाक्रम जुलै आणि ऑगस्ट २०२१ मध्ये घडला. अखेर या ४ पीडित महिलांपैकी एक महिला पुढे आली आणि तिने पोलीस तक्रार नोंदवली. यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झालाय.
हेही वाचा : “पुजाऱ्यानं आधी दारू आणायला सांगितली, मग खोलीत बंद करून मारत गाडीही पेटवली”
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी हिंदूस्थान टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार आरोपींविरुद्ध भारतीय दंडसंहिता कलम ३७६ (२) (बलात्कार) आणि महाराष्ट्र अघोरी कायदा२०१३ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आलाय.