वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव शहरात शाळेत जात असतानाच एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून धावत्या गाडीत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी चाकूचा धाक दाखवून अपहरण केलं आणि कारमध्ये बसवून धावत्या गाडीत लैंगिक अत्याचार केला. या घटनेने एकच खळबळ उडली आहे. तसेच शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुलगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलगी दररोजप्रमाणे घरुन शाळेत जाण्यासाठी निघाली. शाळेत जात असतानाच तिला सुमेध मेश्राम नावाच्या युवकाने आणि त्याच्या एका अनोळखी सहकाऱ्याने आवाज दिला. पीडिता शाळेसमोरील प्रवेशद्वाराजवळ थांबलेली असताना आरोपी सुमेधने चाकूचा धाक दाखवून तिला जबरदस्ती चारचाकी वाहनात खेचत नेले.
पीडितेने आरडाओरड केला, पण कारच्या काचा बंद होत्या. सुमेधने पीडितेवर धावत्या कारमध्येच लैंगिक अत्याचार केले. पीडितेच्या आईने आरोपी सुमेध आणि त्याच्या मित्राविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा केला आहे.
नेमकं काय घडलं?
या घटनेबाबत माहिती देताना पुलगाव पोलीस निरीक्षक शैलेश शेळके म्हणाले, “एका १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार केली की, तिची मुलगी शाळेत जात असताना सुमेध मेश्राम या आरोपीने साथीदाराच्या मदतीने मुलीचं अपहरण केलं. तसेच मुलीला धाक दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या तक्रारीवरून आरोपींविरोधात अपहरण आणि बलात्कार केल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम ३७६, ५०४, ५०६ आणि पोक्सो कलम ४, ६, २१ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.”
हेही वाचा : विश्लेषण : बलात्कार प्रकरणातील शिक्षा काय सांगतात? पीडितांना खरोखर न्याय मिळतो का?
“मुख्य आरोपी आणि त्याला मदत करणारा त्याचा सहकारी अशा दोन्ही आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच आरोपीला अटक होईल,” असंही शेळके यांनी नमूद केलं.