तृप्ती तुपे या शाळकरी विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या तिघा नराधमांना भर चौकात फाशी दिली पाहिजे, असे सांगतानाच या प्रकरणी कठोर कारवाई न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारी पारनेर येथे दिला.
लोणीमावळा येथे घडलेल्या घृणास्पद गुन्हय़ातील नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, त्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी, भविष्यात राज्यात अशाप्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी कठोर कायदे करून ते अमलात आणावेत या मागणीसाठी तालुक्यातील विद्यार्थी, पालकवर्ग तसेच अण्णा हजारे युवा मंचच्या वतीने अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली तोंडाला काळय़ा फिती बांधून तहसील कार्यालयावर मूक मोर्चा नेण्यात आला. तहसीलदार दत्तात्रय भावले यांना निवेदन देण्यापूर्वी हजारे बोलत होते. बाजार समितीचे सभापती काशीनाथ दाते, जिल्हा परिषदेचे सदस्य विश्वनाथ कोरडे, सबाजी गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते शाहीर गायकवाड, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वाघमारे, राळेगणसिद्घीचे सरपंच जयसिंग मापारी, विजय डोळ, अण्णा हजारे युवा मंचचे अध्यक्ष राहुल शिंदे तसेच तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
हजारे म्हणाले, यातील आरोपी पोलिसांनी पकडले आहेत. आता या आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कारवाई करताना काही कसूर झाला तर आपण जिल्हाभर आंदोलन उभे करू, असे सांगतानाच अशा नराधमांना भर चौकातच फाशी दिली पाहिजे. कारण दुसऱ्या लोकांची अशाप्रकारचे कृत्य करण्याची हिंमत होणार नाही. तृप्तीस न्याय मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगून आज तालुक्यातील तरुणांमध्ये संवेदनशीलता निर्माण होऊन त्यांनी अन्याय-अत्याचाराविरोधात आवाज उठविल्याबद्दल हजारे यांनी समाधान व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा