छत्रपती संभाजीनगर मधील रॅपर तरुण राज मुंगासे यांने अलीकडेच एक रॅप गाणं तयार केलं होतं. त्याने चोर, ५० खोके, गुवाहाटी…अशा विविध शब्दांचा वापर करत सध्याच्या राजकीय स्थितीवर गाणं तयार केलं होतं. हे गाणं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलं. यानंतर राज मुंगासे याचं हे रॅप गाणं प्रचंड व्हायरल झालं. याप्रकरणी अंबरनाथमधील एका महिलेच्या तक्रारीवरून रॅपर राज मुंगासे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुन्हा दाखल झाल्यानंतर रॅपर राज मुंगासे बेपत्ता होता. यानंतर त्याने पहिल्यांदाच ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधला. त्याला इतके दिवस लपून का राहावं लागलं? पोलिसांनी काय दबाव टाकला? याबाबतचा खुलासा राज मुंगासे याने केला.

अटकेची माहिती देताना राज मुंगासे म्हणाला, “मुळात मला अटक झालीच नाही. पण संभाजीनगर पोलिसांचा फोन आला होता. त्यानंतर ते लोक माझ्या घरीही गेले होते. संबंधित रॅप व्हिडीओ डिलीट कर आणि माफीचा व्हिडीओ अपलोड कर, अशाप्रकारे त्यांच्याकडून माझ्यावर दबाव टाकला जात होता. पण मला माहीत होतं की, मी त्या व्हिडीओमध्ये काहीच चुकीचं बोललो नाही. तसेच मी कोणत्याही व्यक्तीची वैयक्तिक बदनामी केली नाही. तुम्ही जर ५० खोके घेतलेच नसतील तर तुम्ही ते स्वत:वर ओढून का घेत आहात? मी फक्त ‘चोर’ असा उल्लेख करत गाणं बनवलंय. त्यामुळे तुम्ही चोर असाल, तर ते गाणं तुमच्या मनाला लागणं सहाजिक गोष्ट आहे. पण त्या गाण्यात मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. तसेच मला तो व्हिडीओ डिलीट करायचा नव्हता, म्हणून मी तेथून निघून गेलो.”

हेही वाचा- “अजित पवारांकडून जिवाला धोका”; भाजपा नेत्याच्या तक्रारीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “होय, माझ्याकडून…”

राज मुंगासेनं पुढे सांगितलं की, “जेव्हा एफआयआर दाखल झाली, तेव्हा मी त्या एफआयआरचा व्हिडीओ साहेबांना (अंबादास दानवे) शेअर केला. त्यानंतर दानवेंनी त्यांच्या वकिलाचा नंबर दिला. त्यांच्या वकिलांनी मला सहकार्य केलं. तेव्हापासून मी अंडरग्राऊंडच होतो.”

हेही वाचा- VIDEO: रॅप गाण्यातून मराठी तरुणानं शिंदे गटाला धू धू धुतलं! आव्हाडही उतरले मैदानात; म्हणाले, “याला अटक करू नका”

“मी कुठे आहे? याबद्दल माझ्या कुटुंबियांना काहीच माहीत नव्हतं. माझ्या घरचे थोडे हळवे आहेत. मी कुठे आहे? हे जर त्यांना जर कळालं असतं, तर त्यांनी आजुबाजूला सांगितलं असतं. त्यानंतर शेजारी कधी, कुठे जाऊन काय बोलतील? यावर माझा विश्वास नव्हता. तसेच पोलीस मला ताब्यात घेतील यामुळे मला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करायचा होता, पण त्या कालावधीत तीन दिवस सुट्टी होती, म्हणून मला लपून राहावं लागलं,” असा खुलासा राज मुंगासे याने केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rapper raj mungase first reaction after undergraund rap song on shinde group mla viral video ambadas danve rmm
Show comments