सातारा : साताऱ्याच्या माण तालुक्यात युरोपातील दुर्मीळ फटाकडी (बेलन्स क्रेक Baillon’s Crake) हा पक्षी आढळला आहे. माण तालुक्यातील किरकसाल येथील पाणथळीवर हा पक्षी नुकताच आढळला. याचे निरीक्षण करून ते ‘ई बर्ड’ या आंतरराष्ट्रीय पक्षिनिरीक्षण संकेतस्थळावर नोंद केल्यावर त्यास अधिकृत मान्यताही मिळाली आहे. या नोंदीमुळे साताऱ्याच्या पक्षिनिरीक्षणात एका नव्या विशेष पक्ष्याची भर पडली आहे.

फटाकडी (बेलन्स क्रेक) हा स्थलांतरित व दुर्मीळ पक्षी युरोपच्या पूर्व भागात, तसेच पालेआर्क्टिक प्रदेशात आढळतो. सातारा भागात या पक्ष्याचा आढळ आतापर्यंत दिसलेला नव्हता. सातारा जिल्ह्यात तो पहिल्यांदाच आढळून आला आहे. माण तालुक्यातील किरकसाल हे पूर्वी दुष्काळी गाव होते. या गावातील ग्रामस्थांनी प्रयत्नपूर्वक दुष्काळमुक्ती घडवली आहे. यानंतर येथे जैवविविधता संरक्षण आणि संवर्धनाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. या अंतर्गत या गावासह माण तालुक्यात जैवविविधतेचा शोध आणि अभ्यासाचे कामही सुरू आहे. नयन उपाध्ये, दीक्षा ढमढेरे, प्रथमेश काटकर, अभिजित माने, विशाल काटकर, प्रथमेश राजपकर अणि डेके मेरी यांचे पथक हे काम करत आहे. यातील विशाल काटकर आणि डेके मेरी यांना हे काम सुरू असतानाच फटाकडी या पक्ष्याचे दर्शन घडले. दुर्बिणीच्या साहाय्याने त्यांनी त्याचे निरीक्षण, छायाचित्रण केले. या नोंदीमुळे किरकसाल परिसराचे जैवविविधतेतील महत्त्व अधोरेखित झाले आहे.

फटाकडी हा पक्षी १६ ते १८ सेंमी (६.३ ते ७.१ इंच) लांब असून, थोड्या मोठ्या ‘लिटल क्रेक’ या पक्ष्यासारखा दिसतो. त्याची चोच लहान, सरळ आणि पिवळसर किंवा हिरवट रंगाची असते. मात्र, तळाशी लालसर रंग नसतो. प्रौढ पक्ष्यांचे वरचे शरीर तपकिरी रंगाचे असते, त्यावर काही पांढऱ्या खुणा असतात. चेहरा आणि खालचा भाग निळसर-करडा असतो, तर पार्श्वभागावर काळ्या-पांढऱ्या पट्ट्यांची रचना असते. त्याचे पाय हिरवट रंगाचे आणि बोटे लांब असतात. लहानशा शेपटीच्या खालील बाजूसही पट्टे असतात. त्याचा आहार मुख्यतः कीटक आणि छोट्या आकारातील जलचर प्राणी हा आहे. प्रजनन काळात हा पक्षी लपून राहतो. त्याचा आवाज ‘एडिबल फ्रॉग’ किंवा ‘गार्गनी बदक’ यासारखा खडखडाट करणारा आहे. स्थलांतर किंवा हिवाळी अधिवासाच्या वेळी तो तुलनेने अधिक सहज दिसू शकतो.

माणदेशातील दुष्काळी भागातील पक्षिविविधतेच्या दृष्टीने किरकसालमध्ये झालेली फटाकडी पक्ष्याची नोंद महत्त्वपूर्ण ठरते. महाराष्ट्रात यापूर्वी काही ठिकाणी या पक्ष्याच्या उपस्थितीच्या नोंदी आहेत. मात्र सातारा जिल्ह्यात ‘ई-बर्ड’ संकेतस्थळावर छायाचित्रांसह अशी नोंद यापूर्वी झालेली नाही. – चिन्मय सावंत, माणदेशातील पक्षी अभ्यासक

Story img Loader